लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला. आता वेध लागले आहेत ते चौथ्या टप्प्याचे. त्यामुळे प्रचारसभांना आणखी जोर आला आहे. अशात नेत्यांच्या मुलाखतीही सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा उल्लेख कागदी वाघ असा केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“उद्धव ठाकरे म्हणत आहेत की अब की बार तडीपार. पण हरकत नाही, कमीत कमी या कारणांमुळे उद्धव ठाकरे लोकांमध्ये जात आहेत. ड्रॉईंग रुमचं राजकारण करणारे उद्धव ठाकरे होते. दाल-आटे का भाव आता त्यांना समजला असेल. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्यादिवशी काँग्रेससह जावं लागेल मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करेन. तरीही उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आहेत. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारस उद्धव ठाकरे आहेत पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत.”

उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते पक्षाचे पट्टे गळ्यात घालून टिपू सुलतानचा जयजयकार करत आहेत

“उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांच्या सेनेचे पट्टे गळ्यात घालून टिपू सुलतानचा जय जयकार करतात. उर्दूत कॅलेंडर छापतात त्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभेला संबोधित करण्यापूर्वी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो.. अशी सुरुवात करायचे. त्यातला आता हिंदू शब्द त्यांनी वगळला आहे. उद्धव ठाकरे हे आता सुडो सेक्युलर झाले आहेत. आजकाल त्यांच्यासाठी फतवे निघत आहेत. तसंच सर्वात मोठी बाब ही की ज्या मुंबईवर ज्या कसाबने हल्ला केला आणि मुंबईकरांचा जीव घेतला, तसंच हेमंत करकरेंना ज्या कसाबने मारलं. त्याच्याबाबत आमचे विरोधी पक्षनेते म्हणतात कसाब निष्पाप आहे. पण तीन दिवस होऊन गेले तरीही उद्धव ठाकरे यावर शांत बसले आहेत. मला तर वाटतं की आता दोन गट पडले आहेत आम्ही सगळे उज्ज्वल निकमला पाठिंबा देणारे आहोत, तर समोरचा गट कसाबला पाठिंबा देणारा आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात बत्तीगुल, भर मंचावर अंधार झाल्यावर म्हणाले, “हमको रोक सके किसी अंधेरेमें…”

उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत

“उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकही आंदोलन केलं नाही. कधी तुरुंगात गेले नाहीत. कधीही कुठल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसंच आयुष्यात त्यांनी घोषणाही दिलेल्या नाहीत. आता ते आम्हाला डरपोक म्हणत आहेत. आपल्या देशात पंतप्रधान मोदी असे आहेत ज्यांनी दाखवून दिलं की पाकिस्तानला घरात घुसून मारु शकतो. आता उद्धव ठाकरे ज्यांनी आयुष्यात डासही मारलेला नाही ते आम्हाला पाकिस्तानबाबत सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले असते तर आम्ही ऐकलं असतं. मात्र मच्छरही ज्यांनी मारला नाही त्यांचं आम्ही कशाला ऐकू. तसंच चीन वगैरे बद्दल तर त्यांना काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. त्यांना परराष्ट्र धोरण, जिओ पॉलिटिक्स यातलं काही कळत नाही. काँग्रेससह ते बसले आहेत. त्या काँग्रेसने हजारो एकर जमीन चीनला दिली आहे. तर मोदींनी एक इंच जमीन चीनला मिळू दिलेली नाही. आपल्या देशाच्या इतिहासात डोकलाममध्ये आपण चीन सैनिकांना रोखलं आहे. चीनकडून पैसे घेऊन पक्ष चालवणारे जे आहेत त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, “टिपू सुलतान जिंदाबाद, जनाब बाळासाहेब ठाकरे हे सगळं..”

हा तर उद्धव ठाकरेंचा निर्ल्लजपणा

“मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला हे सगळ्या देशाला माहीत आहे. कारण पहिल्या दिवसापासून हे ठरलं होतं की भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सगळ्या प्रचारसभांमध्ये मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही हे सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दगा दिला आहे, आमच्याशी बेईमानी केली आहे. इतकं सगळं करुन आम्हाला दुषणं देणं हा निर्लज्जपणा आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.