महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसंच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करत असताना अचानक लाईट गेले आणि अंधार झाला. त्यानंतर उपस्थितांनी मोबाईलचे लाईट लावले. त्या प्रकाशात त्यांनी भाषण सुरुच ठेवलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. तुमचे लाईट सुरु झाले आहेत, आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं.

नेमकी कुठे घडली ही घटना?

भुसावळच्या सभेत देवेंद्र फडणवीस रक्षा खडसेंच्या प्रचाराचं भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेले. ज्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही काळजी करु नका. लाईट बंद झाले असले तरीही तुम्ही मोबाईलचे लाईट सुरु केले आहेत. आपला करंटच असा आहे की लाईटची आवश्यकता नाही. काय सुंदर दृश्य आहे बघा. हमको रोक सके ये किसी अंधेरेमें दम नही, रोशनी हमसें है रोशनी से हम नहीं.” असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडीच्या गाडीला फक्त इंजिन आहे

इंडिया आघाडीचे सगळे नेते म्हणतात आम्हीच इंजिन आहोत. तुमच्यासाठी, जनतेसाठी त्यामध्ये जागा नाही. रक्षा खडसेंना निवडून द्या म्हणजे मोदींच्या विकासाची गाडी ही सगळ्यांना त्यामध्ये सामावून घ्या. रक्षाताईंना निवडून दिलं की तो डबा मोदींच्या विकासाच्या इंजिनला लागणार आहे हे विसरु नका. असंही फडणवीस म्हणाले. आज आपण पाहू शकतो की गेल्या दहा वर्षांत मोदींनी देशात परिवर्तन घडवलं आहे. जगातले लोक त्यामुळे चकित झाले आहेत. जगात आज मोदी मॉडेलची चर्चा होते आहे. मोदींनी १० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढलं. १० कोटी महिलांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज दिलं. त्यातून ३ कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत.

हे पण वाचा- वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात लस तयार करण्यासाठी मोदींनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहीत केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वकर्मा योजना आणली. १२ बलुतेदार आणि पारंपरीक व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यासाठी या योजनेच्या मार्फत लाभ करुन दिला. समाजातल्या सगळ्या घटकांना मोदींनी फायदा करुन दिला आहे. तसंच सगळीकडे विकासकामं होत आहेत हेदेखील आपण पाहतो आहोत. आज आपला देश जगातली महासत्ता होतो आहे. एक मजबूत देश अशी प्रतिमा मोदींनी तयार केली. हे आपल्याला कधीच विसरता येणार नाही. करोना काळात नातेवाईकांकडे जाण्याचीही चोरी होती. जगातले तज्ज्ञ म्हणायचे की भारतातले किमान ५० कोटी लोक करोनामुळे मरतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, प्रोत्साहीत केलं. मोदींच्या नेतृत्वात आपल्याच देशात लस तयार झाली. दोन वेळा भारतीयांना लस मिळाली हे विसरता येणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.