माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या तथा राज्यसभेच्या खासदार मीसा भारती यांच्या घरी लालू यादव यांनी दोन दिवसांपूर्वी मटणाचा बेत आखला होता. यावेळी लालू यादव यांनी स्वतः मटण शिजवलं. लालू यादव यांच्या घरी जमलेल्या मटणाच्या बेताचा राहुल गांधी (काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार) यांनी एक व्हिडीओ शूट करून समाजमाध्यमांवर शेअर केला होता. उत्तर भारतातील कॅलेंडरनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मीसा भारतींच्या घरी मटणासह इतर मांसाहाराचा बेत जमला होता. याचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला असून तो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यासह लालू यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनीदेखील समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते हेलिकॉप्टरमध्ये मासे खात आहेत. चैत्र नवरात्रीदरम्यान लालू यादव, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मांसाहार करून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केल्यामुळे या तिन्ही नेत्यांवर भाजपाकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यावरून तिन्ही नित्यांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आज (१२ एप्रिल) त्यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी मोदी यांनी जम्मू काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल, अशी घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक घेणार असल्याची घोषणादेखील केली. मोदी यांनी या भाषणावेळी लालू प्रसाद यादव, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा >> “काँग्रेस काही वर्षांमध्ये डायनासोरप्रमाणे नामशेष होईल”, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातल्या बहुसंख्य लोकांची परवा नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा वाटते. हे लोक श्रावण (उत्तर भारतातली कॅलेंडरनुसार) महिन्यात एका गुन्हेगाराच्या घरी जाऊन मटण शिजवतात, त्याचा व्हिडीओ शेअर करून देशातल्या जनतेला चिडवण्याचं, डिवचण्याचं काम करतात. आपला कायदा कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या आवडीचं जेवण करण्यापासून रोखत नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार शाकाहार अथवा मांसाहार खाण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु, इंडी आघाडीतल्या लोकांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. हे लोक श्रावणात मटण खाऊन त्याचे व्हिडीओ बनवून लोकांना दाखवतात. मुघलांच्या मानसितेतून हे लोक बाहेर पडलेच नाहीत.