Pankaja Munde Parli Assembly Election 2024 : “खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले”, असं मिश्किल वक्तव्य भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी येथील महायुतीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. परळीचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, “खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश…? काय दत्ताभाऊ…? खरं आहे की नाही? पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता… आले मी परत तिथेच… खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले”.

हे ही वाचा >> “आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले खडेबोल!

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

दरम्यान, पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, “माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे”.

हे ही वाचा >> पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

“पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक

मुंबईतील बीकेसी येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “पंकजा ताई तुझे खूप आभार. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. जसे आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडून स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती. तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची काढली.” उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा हवाला दिला. ते म्हणाले, “पंकजा मुंडी म्हणाल्या आहेत की, भाजपाचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात ९० हजार बुथ आहेत. प्रत्येक बुथवर भाजपाचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या १ लाख ८० हजार होते. जर दोन पेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपाने गुजरातमधून आणली आहेत.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde says wanted to be mp but became mla dhananjay munde parli assembly election 2024 asc