पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात पुन्हा एकदा सत्ता काबीज करून देशाचं संविधान बदलायचं आहे, लोकांचं आरक्षण हिरावून घ्यायचं आहे, असे आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा (लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा) नारा दिला आहे. त्यावरून विरोधी पक्ष दावा करत आहेत की, मोदींना केवळ संविधा बदलण्यासाठी इतक्या जागा जिंकायच्या आहेत. या आरोपांना मोदी यांनी आज (२९ एप्रिल) सोलापुरातून उत्तर दिलं. सोलापूरमधील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ मतदारसंघात घेतलेल्या सभेत मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं, तसेच आरक्षणावर भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे या समाजातील लोकांचा आता काँग्रेसवर रोष आहे. ते आता काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला कंटाळले आहेत. परिणामी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लोक गोंधळले आहेत. त्यातून ते लोक मनाला वाट्टेल त्या खोट्या अफवा पसरवू लागले आहेत. ते आता म्हणू लागले आहेत की भारतीय जनता पार्टी संविधान बदलेल, आरक्षण संपवून टाकेल. मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे की, आज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं तर तेसुद्धा आपल्या देशातलं आरक्षण संपवू शकत नाहीत, त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच येत नाही.

कुणाला जर आमच्या हेतूवर संशय असेल, काही प्रश्न असतील तर त्यांनी माझा गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड बघा. २०१९ ते २०२४ पर्यंतचा सगळा रेकॉर्ड तपासून बघा. मला जिथे जिथे मतं हवी तिथे तिथे हवी तितकी मतं मिळाली आहेत. परंतु हा रस्ता मला मंजूर नाही. आरक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास, शेकडो वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झालाय… आमच्या पूर्वजांनी काही पापं केली असतील तर माझ्यासाठी त्या पापांचं प्रायश्चित्त करण्याची ही संधी आहे. त्यामुळे आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

काँग्रेस आणि ‘इंडिया’वर टीका करत मोदी म्हणाले, तुम्ही मला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखता पण इंडी आघाडीचा नेता कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यांचा नेता कोणालाही माहिती नाही कारण इंडी आघाडीत नेत्याच्या नावावरून महायुद्ध चालू आहे. त्यांच्या आघाडीचं नाव ठरलेलं नाही, त्यांचा प्रमुख चेहरा कोण असेल ते ठरलेलं नाही. असं असूनही हे लोक इतका मोठा देश चालवू शकतात का? तुम्ही हा देश अशा लोकांच्या हातात देणार का? कोणी चुकूनही आपला देश अशा लोकांच्या ताब्यात देणार नाही. या लोकांनी देशाची सत्ता काबीज करण्यासाठी वाट्टेल ते केलं आहे. या लोकांनी अनेकदा देशाचं विभाजन केलं आहे. ते आपण विसरून चालणार नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on reservation says we have opportunity to atonement for sins of our ancestors asc