PM Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह जवळपास ६० हून अधिक कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामुळे Modi 3.0 चं मंत्रीमंडळ आता तयार झालं असून आता सरकारच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल. त्याचबरोबर ज्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही, त्यांना पुढच्या मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतीक्षा असेल. यादरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शपथविधीदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले असून त्यासह त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

काय आहे नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सहकारी मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. “आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सगळ्यांचं अभिनंदन. मंत्र्यांची ही टीम तरुण आणि अनुभवी सहकाऱ्यांची खूप छान अशी सांगड आहे. लोकांच्या आयुष्यात सुधारणा आणण्याचे प्रयत्न करण्यात आम्ही अजिबात कसर सोडणार नाही”, असं मोदींनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विदेशी पाहुण्यांचेही मानले आभार

मोदी सरकारच्या या पहिल्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक विदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर काही देशाचे प्रमुखही उपस्थित होते. मोदींनी या सर्वांचे आभार मानले आहेत. “आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व विदेशी पाहुण्यांचे व मान्यवरांचे मी आभार मानतो. मानवाच्या विकासासाठी भारत देश नेहमीच आपल्या सहकारी देशांसह काम करत राहील”, असं आश्वासन मोदींनी या पोस्टमध्ये दिलं आहे.

१४० कोटी भारतीयांची सेवा!

दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये मोदींनी १४० कोटी भारतीयांची सेवा करण्याचं आश्वासन दिलं आहे. “आज संध्याकाळी मी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मी देशातील १४० कोटी भारतीयांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असेन. तसेच, भारताला विकासाच्या नव्या क्षितिजावर नेण्यासाठी मी व माझे सहकारी मंत्री एकत्र मिळून काम करू”, असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

PM Modi Cabinet 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी; ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ!

आधी मोदी, नंतर पहिले पाच मंत्री!

दरम्यान, यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.