शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सरु आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांची राजन विचारे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“खासदार संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. मात्र, यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत ते आपण पाहणार आहोत. ज्यांनी तुरुंगात टाकले उद्या त्यांनाही मी तुरुंगात टाकणार आहे. तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत ते पाहू. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात इंग्रजांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हते. मात्र, तेव्हा लोकमान्य टिळक यांनी ठणकावून सांगितले होते की, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आज लोकमान्य टिळकांनाही अभिमान वाटत असेल की, महाराष्ट्र माझा जागा आहे. तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न त्यांनी विचारला होता. मात्र, आजच्या सरकारला डोक नाही, त्या डोक्याच्या जागी फक्त खोके आहेत. हे खोकेबाज सरकार आहे. डोकेबाज सरकार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारवर केली.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, “दोन वक्री वादळं…”

“२०१४ साली ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी ठरले होते. त्यावेळी भाजपाच्या त्यावेळच्या अध्यक्षांनी मला फोन केला होता. मात्र, जे झाले ते झाले. उद्धव ठाकरे २०१४ मध्येही पक्षप्रमुख होते. २०१९ मध्येही पक्षप्रमुख होते आणि आजही पक्षप्रमुख आहेत. खऱ्या शिवसेनेला जे नकली म्हणतात, हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. माझ्या शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली माणसं आहेत. आमचे नाणे खणखणीत आहे. मोदी यांच्यासारखे तकलादू नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली.

“नरेंद्र मोदी यांचे नाव महाराष्ट्रात चालत नाही म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावावा लागतो आहे. एकनाथ शिंदे यांनी सभेत त्यांच्या वडीलांचा फोटो लावावा. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावू नये. कलम ३७० हटवले त्यावेळी आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, जम्मू-काश्मीर आजही सुरक्षित का नाही? आजही मोदी महागाईबाबत बोलत नाहीत. नोकऱ्यांबाबत बोलत नाहीत. १० वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी अशी जाहीरात करते की, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात. मात्र, आता मोदींच्या पराभवाने भारतात जल्लोष होणार आहे. भाजपाला मत दिले तर पाकिस्तानात जल्लोष होईल. कारण पाकिस्तानात न बोलवता नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचा केक खायला कोण गेले होते”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.