पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपला सोशल मीडिया डीपी तिरंगा राष्ट्रध्वजाचा फोटो लावला आणि देशातील सर्व नागरिकांनाही तसं करण्याचं आवाहन केलं. भाजपाशासित केंद्र सरकारने देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम’ सुरू केली. मात्र, काँग्रेस नेत्यांनी या मोहिमेवरून भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत संघाने ५२ वर्षे नागपूरमधील आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही, असा आरोप केला. यानंतर देशभरात संघ आणि तिरंगा राष्ट्रध्वजावरून भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते यांचा वाद सुरू झाला. नेमका हा वाद काय आहे? काँग्रेसचे आरोप काय, संघाची भूमिका काय आणि त्यातील ऐतिहासिक तथ्य काय? यावरील हे विश्लेषण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याचा तिरंगा वाद काय?

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर आपला ‘डीपी’ म्हणून तिरंग्याचा फोटो लावला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांनी भाजपाची मातृसंघटना असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने डीपी म्हणून तिरंगा न लावल्याचा आणि जवळ ५० वर्षे राष्ट्रध्वज न फडकावल्याचा आरोप केला. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवणारे ५२ वर्षे आपल्या मुख्यालयावर तिरंगा न फडकावणाऱ्या देशद्रोही संघटनेतून आले आहेत, याचा इतिहास साक्षीदार आहे.”

जयराम रमेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “आम्ही आमचे नेते पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा हातात तिरंगा घेतलेला फोटो डीपी म्हणून ठेवत आहोत. मात्र, पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्या कुटुंबात पोहोचलेला दिसत नाही. ज्यांनी ५२ वर्षे नागपूरमधील आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही ते पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का?”

या वादानंतरही आरएसएसकडून डीपी म्हणून तिरंगा ठेवणार की नाही याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. मात्र, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचं राजकारण केल्याचा आरोप करत संघाने काँग्रेसवर टीका केली.

संघाचे माध्यम प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे. संपूर्ण देशाने हा उत्सव एकत्रपणे साजरा केला पाहिजे. ९ जुलैला संघाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर संघटनांकडून घोषित केलेल्या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा दिला आहे. तसेच सर्व संघ स्वयंसेवकांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये. सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन हा उत्सव साजरा करायला हवा.”

५२ वर्षे संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही?

संघाच्या शाखांवर भगवा ध्वज फडकावला जातो. सर्वात पहिल्यांदा संघाच्या नागपूरमधील मुख्यालयावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर जवळपास पाच दशकं संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकला नाही. यानंतर २६ जानेवारी २००२ रोजी तिरंगा फडकावण्यात आला. असं होण्यामागे २००२ पूर्वीची कठोर ध्वजसंहिता जबाबदार असल्याचा दावा संघाचे सदस्य करतात.

संघाच्या मुख्यालयावर जबरदस्तीने तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न

२६ जानेवारी २००१ रोजी राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या काही सदस्यांनी संघाच्या स्मृती भवन या नागपूरमधील मुख्यालयावर जबरदस्तीने तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होऊन खटलाही चालला आहे. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने (PTI) १४ ऑगस्ट २०१३ रोजी याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, “संघ मुख्यालय प्रभारी सुनिल कथले यांनी आधी राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या सदस्यांना मुख्यालय परिसरात प्रवेशापासून रोखलं आणि नंतर तिरंगा फडकावताना रोखण्याचा प्रयत्न केला.”

या प्रकरणात तिघांविरोधात खटला दाखल होता. त्यांना पुराव्या अभावी २०१३ मध्ये निर्दोष सोडून देण्यात आलं.

हेही वाचा : संघ कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवणारे तिघे निर्दोष

संघाच्या नेत्यांचं तिरंग्यावर मत काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट्स’ या आपल्या पुस्तकात तिरंग्यावर भाष्य केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, “आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज ठरवला आहे. त्यांनी असं का केलं? फ्रेंच राज्यक्रांतीत फ्रेंचने त्यांच्या राष्ट्रध्वजावर समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे विचार दाखवण्यासाठी तीन पट्टे तयार केले. त्याच मुल्यांवर अमेरिकेची स्वातंत्र्य चळवळ होती. त्यांनीही फ्रेंचांप्रमाणे राष्ट्रध्वज स्वीकारला. त्यामुळे काँग्रेसने देखील तसाच राष्ट्रध्वज घेतला.”

“आधी तिरंग्यावरील रंगामधून धार्मिक ऐक्य दाखवण्यात आलं. भगवा रंग हिंदूंसाठी, हिरवा मुस्लिमांसाठी आणि सफेद रंग इतर सर्व समुदायांसाठी असं सांगण्यात येत होतं. गैरहिंदू धर्मांपैकी मुस्लीम धर्माचा प्रमुख नेत्यांच्या मनावर प्रभाव होता आणि मुस्लिमांशिवाय आपलं राष्ट्रीयत्व पूर्णच होऊ शकत नाही असा त्यांचा विचार होता. काही लोकांनी या धार्मिक मांडणीला आक्षेप घेतला. त्यानंतर या रंगांवर भगवा रंग त्याग, सफेद शुद्धता आणि हिरवा शांततेचा रंग असं स्पष्टीकरण देण्यात आलं,” असं बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकरांनी म्हटलं होतं.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ मासिकात म्हटलं होतं, “भारतीय नेते आपल्या हातात तिरंगा देऊ शकतात, मात्र त्याला कधीही आदर मिळणार नाही आणि हिंदूंकडून कधीही स्वीकारला जाणार नाही. तीन अक्षरांचा शब्द आणि तीन रंग असलेला ध्वज देशावर वाईट मानसिक परिणाम करेल आणि ते देशासाठी धोकादायक असेल.”

२०१५ मध्ये चेन्नईमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सेमिनारमध्ये म्हटलं होतं, “राष्ट्रध्वजावर केवळ भगवा रंग असायला हवा. कारण इतर रंग धार्मिक विचारांचं प्रतिनिधित्व करतात.”

हेही वाचा : मोदी यांनी राष्ट्रध्वजावर केलेल्या स्वाक्षरीमुळे वादंग

२०१८ मध्ये संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे बोलताना म्हटलं होतं, “संघ आपल्या शाखांवर तिरंगा राष्ट्रध्वज न फडकवता भगव ध्वज का फडकावतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, तिरंग्याच्या जन्मापासून संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासोबत जवळचं नातं आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on national flag tiranga rss bjp and congress rahul gandhi allegations pbs
First published on: 07-08-2022 at 22:35 IST