कोल्हापूर : शहरातील वर्षा नगर भागात होत असलेल्या सांडपाणी प्रक्रियेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करीत स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढला. हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने वर्षा नगर या भागामध्ये सांडपाणी प्रकल्प (एसटीपी प्रकल्प) राबवला जाणार आहे. यामुळे वर्षा नगर , वृंदावन पार्क, अरिहंत पार्क, लाइफस्टाईल सोसायटी, अथर्व , संभाजी हाउसिंग सोसायटी आदी परिसरातील नागरिकांनी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकल्प नागरी वसाहती मध्ये होत असल्याने आरोग्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या भीतीतून आज परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा महापालिकेवर आला. महापालिकेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी आंदोलकांनी सांगितले की, वर्षानगर मध्ये होत असलेल्या नियोजित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी या जागेवरील १६३ झाडे भुईसपाट करण्यात आले आहेत. त्यात आठ चंदन झाडांचा समावेश आहे. कोल्हापूर महापालिका एकीकडे वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. शासनाकडूनही वृक्षारोपण करण्यात यावी यासाठी मोफत झाडे पुरवली जात आहेत. एकूणच वनराई वाढावी असा सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु चांगल्या प्रकारे वाढलेली झाडे जमीनदोस्त करण्याचा कोल्हापूर महापालिकेचा पराक्रम समजण्याच्या पलीकडे आहे. ही कृती विना परवाना केल्याची माहिती असल्याने ही झाडे तोडण्याशी संबंधित असणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
एसटीपी प्रकल्पास आमचा विरोध नाही पण तो दाट नागरी भागात होत आहे. त्याचे नदीपासूनचे अंतर खूपच दूरच आहे. नागरी वस्तीत प्रकल्प झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाचे दीपक देसाई, महेश वासुदेव, किशोर खानविलकर, सुरज सुर्वे , संभाजी चव्हाण , श्रीकांत कुऱ्हाडे , दिपाली औंधकर , अश्विनी पंडत, मनीषा रानमाळे, आशालता पवार, संदीप आफळे, हितेश ओसवाल, दीपक ओसवाल, अनुराधा पाटील यांच्यासह नागरिक , महिला, युवक सहभागी झाले होते.
इच्छुकांची संख्या जास्त
वर्षा नगर आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास एसटीपी प्रकल्पामुळे धोका निर्माण होणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सहानुभूतीचा मुद्द्यावर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवणे इच्छुकांना सोपे जाणार आहे. त्यामुळे आजच्या मोर्चाला सर्वपक्षीय इच्छुकांनी हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार असा गाजा वाजाही झाला होता. परंतु ज्या प्रमाणात प्रचार , प्रसिद्धी झाली होती त्या तुलनेने मोर्चाला मिळालेला प्रतिसाद मात्र यथातथाच होता. त्याची महापालिका परिसरात चर्चा होती.