कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी शाहू प्रेमी कोल्हापूरकरांनी दसरा चौकात निदर्शने केली. मंडलिक यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोल्हापूरकरांसाठी आदराचे स्थान असणाऱ्या गादीबद्दल आणि शाहू महाराजांबद्दल अपमानजनक आणि वादग्रस्त करणाऱ्या संजय मंडलिक यांचा जाहीर निषेध करण्यासाठी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने दसरा चौक येथे जमावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यास शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा…आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत; संजय मंडलिक यांची काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आर. के. पोवार , ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रवीकिरण इंगवले, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह अनेकांनी संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांनी कोल्हापूरच्या गादीचा आणि जनतेचा अपमान केला असल्याने माफी मागावी , अशी मागणी केली.