अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. याद्वारे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यावर अखेर पडदा पडला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. यासह भारतीय क्रिकेटरसिकांना एका बातमीने दिलासा दिला आहे. ती बातमी म्हणजे मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं संघात पुनरागमन झालं आहे. परंतु, बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की हे दोन्ही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले तरच त्यांचा अंतिम ११ जणांच्या संघात समावेश केला जाऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी (९ फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. आज सकाळी या संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने संघात फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. केवळ आकाश दीप या नव्या खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विराट आणि श्रेयसचा संघात समावेश न केल्यामुळे सरफराज खान आणि रजत पाटीदारच्या संघातील स्थानाला धक्का लागलेला नाही.

दुसऱ्या बाजूला, भारतीय क्रिकेटरसिकाना विराटला पांढऱ्या जर्सीत पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण,इं ग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळणार नाही. विराटने त्याच्या अनुपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाला आणि निवड समितीला कळवलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे पदार्पणानंतर पहिल्यांदाच विराट कोहली घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेला मुकणार आहे.

श्रेयस अय्यर उर्वरित मालिकेला मुकणार

विराट कोहलीपाठोपाठ भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरदेखील मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. बीसीसीआय त्याच्या सुधारणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हे ही वाचा >> Ind vs Eng Test: विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर; श्रेयस अय्यरही अनुपस्थित; तिसऱ्या कसोटीत काय असेल संघ?

असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप (* खेळाडूंचा प्लेईंग ११ मधील समावेश फिटनेस टेस्टवर अवलंबून आहे)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announced team india squad for final three tests against england asc