Sanjay Raut Health Issue: शिवसेनेचे (ठाकरे) नेते, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे. ते सध्या एका आजाराने ग्रस्त असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. खुद्द संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे ही माहिती जाहीर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारी आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर आता ‘कोण संजय राऊत?’ असा प्रश्न विचारणारे विरोधकही पोस्ट शेअर करत आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण हे उत्तरेतील आणि दक्षिणेतील राजकीय संस्कृतीपेक्षा अतिसय वेगळे आहे, असे नेहमी बोलले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून याच्या उलट चित्र दिसत होते. काल एकत्र असलेले आज एकमेकांचे विरोधक आहेत, तर एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आज मांडीला मांडी लावून बसले आहेत, असे राज्याच्या राजकारणाचे चित्र झाले. त्यात टिकेची बदलेली भाषा अनेकांच्या मनात राजकारणाविषयी उबग आणणारी झाली होती.
मात्र संजय राऊत यांनी प्रकृतीविषयी माहिती दिली, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आणि महाराष्ट्रातील विरत चाललेल्या राजकीय संस्कृतीची झलक पुन्हा दिसली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संजय राऊत यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही वृत्तवाहिन्यांनी याचे लाईव्ह प्रक्षेपण केले.
तर शिवसेना (शिंदे), भाजपामधील अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. कोणत्या नेत्याने काय म्हटले? हे खालील पोस्टमधून पाहू.
शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी पोस्टद्वारे म्हटले, “संजय राऊत साहेब, आराम करा, लवकर बरे व्हा!
कारण, “शरीरं आद्यं खलु धर्म साधनं!!”
भाजपाचे नेते, कॅबिनेट मंत्री नितीशे राणे यांनीही संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल पोस्ट केली. ते म्हणाले, संजय राऊतजी, काळजी घ्या. लवकर बरे व्हा!.
शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या, शीतल म्हात्रे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणाल्या, “वैचारिक मतभेद असले तरी मनभेद संजय राऊत जी यांच्या सोबत कधीच नव्हते…
लवकर बरं होऊन पुन्हा त्यांनी राजकारणाच्या मैदानावर सज्ज व्हावं, हीच आमची सदिच्छा त्यांच्यासोबत आहे.”
भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. “संजय राऊत काळजी घ्या, लवकर बरे व्हा! पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा मैदानात या. राऊतांची प्रकृती सुधारावी यासाठी देवाकडे प्रार्थना”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
कोण संजय राऊत? अशा प्रश्न विचारणाऱ्यांच्या पोस्ट
भाजपाचे अनेक नेते संजय राऊत यांच्याबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न विचारून उत्तर न देणे पसंत करतात. याबद्दल एका पत्रकाराने एक्सवर पोस्ट करून लक्ष वेधले. या पोस्टला संजय राऊत यांनी शेअर करत धन्यवाद असे लिहिले आहे.
संजय राऊत यांची कमतरता
आज मविआ, शिवसेना-मनसे युतीचा निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा मुंबईत धडकला. ठाकरे बंधू रस्त्यावरही यावेळी एकत्र दिसले. मात्र ठाकरे बंधूंचे भक्कम पाठिराखे, पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे आणि विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत मोर्चात दिसले नाहीत. मविआच्या अनेक नेत्यांना संजय राऊत यांची कमतरता जाणवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबद्दल आपली भावना व्यक्त करताना म्हटले, “मा. संजय राऊत साहेब, तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरं होऊन अन्यायाविरोधात लढण्यासाठी ‘तोफखाना प्रमुख’ पदाची सूत्र पुन्हा हाती घ्या..! आमच्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत. आपण लवकरात लवकर ठणठणीत बरे बरे व्हाल, असा विश्वास आहे. आपण पुन्हा येईपर्यंत आपली कमी मात्र आम्हाला निश्चितच भासेल.”
