Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची तयारी, पक्ष संघटनेचा आढावा, मतदारसंघातील कामाचा आढावा तसेच विविध ठिकाणी सभा, मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत उमेदवारांची चाचपणी नेत्यांकडून सुरु असल्याचं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु असत्याचं दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीचेही ठिकठिकाणी मेळावे सुरु आहेत. आता आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत धनंजय मुंडे यांना एक खास सल्लाही दिला.

हेही वाचा : Ajit Pawar : “असा दरारा निर्माण झाला पाहिजे की पुन्हा…”, बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका

बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी आलेल्या कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवेळी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवत जोरदार स्वागत करण्यात आलं. यावरूनच अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचे कान टोचले. “अरे… धनंजय चटके आणि फुलं नको नको झालीय. मिरवणूक सुरु झाल्यापासून ते व्यासपीठावर येईपर्यंत असे चकटे बसलेत काय सांगू?”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

अजित पवार काय म्हणाले?

“धनंजय मुंडेंनी ठरवलं होतं की आम्ही सर्वजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरु करायची नाही. पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि मी (अजित पवार) आम्ही लवकर आलो. त्यानंतर आम्ही म्हटलं की कार्यक्रम सुरु करूयात. मात्र, धनंजय मुंडे हे म्हणाले की, नाही सर्व आल्यानंतर एकत्रच मिरवणूक सुरु करायची. आता मिरवणूक सुरु झाल्यापासून ते व्यासपीठावर येईपर्यंत सर्वांना असे चकटे बसलेत काय सांगू? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हणाले की चकटे बसतात. पंकजा मुंडे आणि मलाही चकटे बसले. आता शिवराज सिंह चौहान हे पाहुणे आहेत, त्यामुळे ते कशाला म्हणतील की चकटे बसलेत. अरे धनंजय पाहुण्यांना बोलवत जा, आदर करत जा. पण ते चटके आणि फुलं काय नको नको झालंय. उत्साहाच्या भरात काही गोष्टी थोड्या जास्त होतात, त्यामुळे आपण मर्यादा ठेवली पाहिजे”, असं म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचे कान टोचले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on agriculture festival krishi mahotsav 2024 in beed dhananjay munde gkt