Anil Deshmukh Press Conference: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सध्या समित कदम नावाच्या व्यक्तीबाबत दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे,तर दुसरीकडे फडणवीसांनीही आपल्याकडे रेकॉर्डिंग्ज आहेत, असा दावा केला आहे. यानंतर अनिल देशमुकांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला असून त्याचे फडणवीसांशी घरोब्याचे संबंध असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

अनिल देशमुख यांनी चार दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला. “परमबीर सिंग यांच्याआडून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. ईडी-सीबीआयची चौकशी लावली. त्यातून बाहेर पडायचं असेल, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब अशा विरोधातील नेत्यांवर खोट्या आरोपांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी माझ्यावर देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला”, असा आरोप अनिल देशमुखांनी केला. “मी पुराव्यांशिवाय कधीच बोलत नाही, माझ्याकडे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे”, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.

अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अनिल देशमुखांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अनिल देशमुख हे विनाकारण अपप्रचार करत आहेत. त्यांनी आधी त्यांच्याकडचे पुरावे जाहीर करावेत. त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या व्हिडीओ क्लिप्सही जाहीर करेन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा चालू असतानाच आता अनिल देशमुखांनी भर पत्रकार परिषदेत समित कदमचं नाव घेऊन त्याचे फडणवीसांशी घरोब्याचे संबंध असल्याचा आरोप केला आहे.

Anil Deshmukh on Samit Kadam: अनिल देशमुखांनी अखेर ‘त्या’ व्यक्तीचं नाव सांगितलं; देवेंद्र फडणवीसांकडून प्रतिज्ञापत्रांची ‘ऑफर’ घेऊन आल्याचा केला होता दावा!

काय म्हणाले अनिल देशमुख?

अनिल देशमुख यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत समित कदमचे देवेंद्र फडणवीसांबरोबरचे फोटो दाखवून आपल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा केला. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना मिरजच्या समित कदमला माझ्याकडे ५ ते ६ वेळा पाठवलं. एकदा तो एक बंद पाकीट घेऊन आला होता. मला सांगितलं की याचं प्रतिज्ञापत्र करून द्या. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अशा अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. माझ्याकडे ते पाकीट आणणारा माणूस समित कदम होता”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

“समीत कदमला वाय सुरक्षा दिली आहे, हा इतका महत्त्वाचा आहे?”

“त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांचे अनेक फोटो दिसतील. त्याचे फडणवीसांशी घरगुती संबंध आहेत. समीत कदमची पत्नी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधतानाचेही फोटो आहेत. समीत कदम साधा नगरसेवकही नाहीयेय. देवेंद्र फडणवीसांनी त्याला वाय सुरक्षा दिली आहे. आता हा इतका कोणता कामाचा माणूस आहे की ज्याला या सरकारनं वाय सुरूक्षा दिली आहे?” असा सवालही अनिल देशमुख यांनी केला आहे.

Samit Kadam On Anil Deshmukh : “….म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”; अनिल देशमुखांनी नाव घेतलेल्या समित कदमांनी केला खुलासा!

“मिरज-सांगलीत चौकशी केली तर कुणीही तुम्हाला सांगेल की समीत कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहेत”, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.

“विरोधकांच्या मुलांवरही फडणवीसांचे खोटे आरोप”

“ज्या पद्धतीने माझ्यावर हा दबाव टाकला गेला, उद्धव ठाकरेंना खोट्या आरोपात फसवण्याचा दबाव मी समजू शकतो कारण ते राजकीय विरोधक आहेत. पण त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेवरही आरोप करायला सांगितले. तीन वर्षांपूर्वी अजित पवार त्यांचे विरोधक होते. त्यामुळे त्यांचं समजू शकतो. पण त्यांचा मुलगा पार्थवरही आरोप करायला सांगितलं. म्हणजे राजकीय विरोधकांच्या मुलांनाही खोट्या आरोपांत कसं अडकवता येईल, याचा प्रयत्न तीन वर्षांपूर्वी प्रयत्न केला”, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh slams devendra fadnavis on samit kadam relation pmw