Samit Kadam On Anil Deshmukh : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. या दोघांमध्ये यावरून कलगीतुरा रंगला असताना आता अनिल देशमुख यांनी समित कदम नावाची व्यक्ती फडणवीसांचा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, याबाबत आता स्वत: समित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले समित कदम? समित कदम यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांच्या आरोपावर भाष्य केलं. “अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तिथे मी त्यांच्या परवानगी शिवाय जाऊ शकत नव्हतो. मुळात त्यांनीच मला तिथे बोलवलं होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो”, असं समित कदम म्हणाले. हेही वाचा - नागपूर : पुतण्याची काकावर टीका, म्हणाले “अनिल देशमुख सुरुवातीपासून फॅशनेबल नेते, ‘तो’ पेन ड्राइव्ह करप्ट…” पुढे बोलताना, “मी अनिल देशमुखांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून माझ्या काही अडचणींमध्ये मला मदत करावी, अशी मागणी केली. याबाबत माझी त्यांच्याशी निश्चितच चर्चा झाली”, असा खुलासाही त्यांनी केला. “अनिल देशमुख ज्यापद्धीने देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहेत, ते चुकीचं आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी अनिल देशमुखांकडे जा, असं मला कधीही सांगितलेलं नाही. अनिल देशमुखांनी मला बोलवलं म्हणून मी तिथे गेलो. खरं तर अनिल देशमुख हे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी अशा किरकोळ गोष्टींवर चर्चा करणे आणि तीन वर्षांनी हा विषय काढून नव्याने वाद निर्माण करणे योग्य नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला हे शोभत नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. हेही वाचा - Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख यांचं पुन्हा आव्हान, “क्लिप्स असतील तर…” अनिल देशमुखांनी नेमकं काय म्हटलं? टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्तानसार, देवेंद्र फडणवीसांनी खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी समित कदम नावाच्या व्यक्तीला पाठवलं होतं, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. “समित कदम असं त्या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती मिरजमधील जनसुराज्य शक्ती पार्टीच्या युवक गटाची अध्यक्ष आहे. तेव्हा मी गृहमंत्री होतो. माझ्या शासकीय निवासस्थानी समित कदम आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना माझ्याशी बोलायचंय असं सांगितलं. त्यानंतर समित कदम यांनी फडणवीसांना फोन लावून माझं त्यांच्याशी बोलणं करून दिलं”, असं अनिल देशमुख म्हणाले. “समित कदम यांनीच त्या आरोपांचा ड्राफ्ट असलेलं पाकिट आणून दिलं होतं ज्यांचं प्रतिज्ञापत्र मी सादर करावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्याकडे या चर्चेचं व भेटीचं व्हिडीओ फूटेजही आहे. योग्य वेळ आल्यावर मी ते जाहीर करेन”, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं.