मुंबई : भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घाऊक पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि पुढील काळातही शिवसेनेची (एकनाथ शिंदे) कोंडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेविरोधात (एकनाथ शिंदे) निवडणूक लढलेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते व पदाधिकारी यांना भाजपकडून प्रवेश देण्यात येत आहे. नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीतील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते अद्वय हिरे, छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे, जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत, सांगली जिल्ह्यातील उद्योजक व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख पवन ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे आदी उपस्थित होते.

नाशिक, मालेगाव महापालिकेवर आणि नाशिक जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी आपण निर्धाराने प्रयत्न करू, असे हिरे यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर आणि जिल्हा परिषदेवरही भाजपाचा झेंडा फडकावू, असा विश्वास राजू शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे यांच्यासमवेत अजय शिंदे, युवराज भालेराव, गोरख देहाडे, संदीप शिंदे माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड, गोकुळ मलके, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, अभिजित पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड – सोयगाव विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनराज बेडवाल, उबाठाचे उपजिल्हाप्रमुख नितीन राठोड, स्वप्नील दहिभाते, कैलास वाणी, रामभाऊ पेरकर, राहुल निकम, अनिल वाणी आदींचा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.

अद्वय हिरे यांच्या बरोबर ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक सुरेश गवळी, मालेगाव बाजार समिती संचालक नंदलाल शिरोळे, युवासेना जिल्हा प्रमुख मनोज जगताप, विनोद बोरसे, रवींद्र सूर्यवंशी, काशिनाथ पवार आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. सांगलीच्या विजय पाटील यांच्याबरोबर सुरेश पाटील, शिवाजी पवार, प्रकाश पाटील आदींचा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.