Today’s Top 5 Political Happenings In Maharashtra: येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तर युत्या-आघाड्यांमध्ये कुरबुरीही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या बातमीच्या माध्यमातून दिवसभरातील पाच महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रियांचा आढावा घेऊया.
“भाजपाकडून मला पाडण्याचा प्रयत्न”, अजित पवार गटाच्या आमदाराचा आरोप
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी महायुतीतीलच भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “युती असतानाही भाजपाने विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात पुतण्याला पाच कोटींची मदत करून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला.” चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेतून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
“आमदार संग्राम जगताप यांची हकालपट्टी करा”, सुप्रिया सुळे यांची मागणी
अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप, त्यांनी गेल्या काही महिन्यांत केलेल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी, “दिवाळीत हिंदूंनी केवळ हिंदू दुकानदारांच्या दुकानातूनच खरेदी करावी”, असे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आमदार संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने आमदार संग्राम जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “कारणे दाखवा नोटीशीने काही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी.”
“आमदार संग्राम जगताप यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. देश कोणाच्या मर्जीने नव्हे तर संविधानाने चालणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून चालणार नाही, तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करा”, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“पहिला महापौर आमचाच होणार”, भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांचे वक्तव्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. “महानगरपालिका निवडणुकीत युती करायची की नाही, याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी जिल्हाध्यक्षांसह समन्वय समितीला दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीत युती करायची की नाही, याबाबत निर्णय स्थानिक पातळीवर होईल”, असे जालन्यातील भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होईल आणि पहिला महापौर आमचाच होणार, असा दावा गोरंट्याल यांनी केला आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ३५ हून अधिक उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी असल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले. “चांगले चेहरे फक्त भाजपाकडे आहेत. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे चेहरे नाहीत”, अशी टीका देखील गोरंट्याल यांनी केली.
“…तर उद्धव ठाकरेही नरेंद्र मोदींसोबत दिसले असते”, भाजपाच्या मंत्र्याचा टोला
नवी मुंबईच्या विमानतळाला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा डाव आखला जात आहे, या संजय राऊत यांच्या आरोपावर भाजपाचे मंत्री आकाश फुडणकर यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, “संजय राऊत यांना उठता बसता नरेंद्र मोदींशिवाय काही दिसत नाही. त्यांना आता पश्चाताप होत आहे की आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिलो असतो, तर विमानतळाच्या उद्घाटनाला त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनाही उपस्थित राहता आले असते. त्यामध्ये त्यांना भाषणही करता आले असते.”
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्यास माझी काहीही अडचण नाही”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत. एक कुटुंब म्हणून दिवाळीसाठी एकत्र आले पाहिजे, सर्व भाऊ-बहिणी एकत्र आले पाहिजेत यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काहीही अडचण नाही.”