बीड : मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आंदोलनाच्या कालावधीतच बीड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली होती, तर अन्य तिघांचा मृत्यू झाला होता. यातील तीन तरुणांच्या कुटुंबीयांना रविवारी माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून प्रत्येकी तीन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. तानाजी सावंत यांचे प्रतिनिधी म्हणून मराठा समन्वयक महेश डोंगरे व सहकाऱ्यांनी ही मदत तीन्ही तरुणांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
यामध्ये बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील भरत खरसाडे, सतीश देशमुख व महारुद्र खाकरे यांचा समावेश आहे. भरत खरसाडे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. खरसाडे यांच्या कुटुंबीयांशी आमदार सावंत यांनी फोनवरून संपर्क साधत त्यांचे सांत्वन केले. “आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. चिंता करू नका, अडचणीला काही लागलं तर आपला मराठ्यांचा चमू आहे” असे म्हणत सावंत यांनी या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदत केली आहे.
तर वरपगाव येथील सतीश देशमुख यांचा मुंबईला आंदोलनासाठी जात असताना हृदयविकाराच्या धक्क्याने वाटेतच मृत्यू झाला होता. वाकनाथपुर येथील महारुद्र खाकरे यांचाही मृत्यू झाला होता. या दोन्ही कुटुंबीयांनाही प्रत्येकी तीन लाखांची मदत तानाजी सावंत यांचे प्रतिनिधी महेश डोंगरे यांनी सुपूर्द केली.
धनंजय मुंडेंकडून एक लाख
अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील नितीन माणिकराव चव्हाण यांनी ३० ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांत्वन करत नाथ प्रतिष्ठानमार्फत एक लाख रुपयांची मदत केली. चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्याचे कुटुंबीयांना सांगितले. राज्य शासनाच्या वतीनेही आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.