परभणी : अतिवृष्टीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीक विम्याचे पैसे मिळतील असे आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. ऐन दिवाळीत शेतकरी त्रस्त आहे या पार्श्वभूमीवर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सरकार विरोधात आंदोलन केले. दोन्ही पक्षांनी काळे फलक लावून काळी दिवाळी साजरी केली. काँग्रेसने पिठलं भाकरी आंदोलन केले तर राष्ट्रवादीने मौन धारण करून सरकार विरुद्ध संताप व्यक्त केला.

महायुती सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर करून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. दिवाळी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकू असे सांगणाऱ्या सरकारने किती शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये टाकले ते स्पष्ट करावे असा आरोप काँग्रेसने केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सोमवारी (दि.२०) सकाळपासून मौन धारण करून काळी दिवाळी साजरी केली. अतिवृष्टी आणि पुराने राज्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अभुतपूर्व नैसर्गिक संकट उद्भवल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, सय्यद युनूस सय्यद सरवर, गंगाप्रसाद यादव, मनोज थिटे पाटील, रामदास आढे, अशोक चांदवडे, मनोहर कदम, लखन चव्हाण, शिवाजी नेटके, शाम गवारे, अ‍ॅड.अंकूश कच्छवे, संतोष बोबडे, राजू आवाडे, चरण नेटके, एस.डब्ल्यू. परसोडे, गंगाधर जवंजाळ, गजानन लव्हाळे आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या आंदोलनात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नदीम इनामदार, रामभाऊ घाडगे, अमोल जाधव, सुहास पंडित आदिसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण परिस्थितीची असून राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. शेतकरी संकटात असताना सरकार निर्धास्त असून ही दिवाळी शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत साजरी करावी लागत आहे. दिवाळी सारखा सण सुद्धा शेतकऱ्यांना दारिद्र्यात करावा लागत असून त्यामुळेच काँग्रेसचे हे पिठलं भाकर आंदोलन असल्याचे बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.