Marathi News Live Today: गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराजीच्या अफवांमुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra Political Live News Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

13:53 (IST) 20 Apr 2023
तेल उत्पादकांच्या नफ्यावर पुन्हा ‘विंडफॉल’ करभार; डिझेल निर्यातीवरील कर शून्यावर

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती पुन्हा तापल्याने केंद्र सरकारने बुधवारी देशांतर्गत तेल उत्पादकांच्या नफ्यावर पुन्हा एकदा ‘विंडफॉल’ करभार लादला आहे. मात्र डिझेलच्या निर्यातीवरील कर शून्यावर आणण्याचाही निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा..

13:52 (IST) 20 Apr 2023
यारी भांडवलशाहीच्या हाती पायाभूत विकासप्रकल्प असणे धोक्याते नाही का ?

शरद पवारांनी अदानी उद्योगसमूहाबद्दल केलेली विधाने हा राष्ट्रीय पातळीवर गाजत असलेला विषय आहे. पण यासंदर्भातील बहुतांश चर्चा ही राजकीय अंगाने होत आहे. ती आर्थिक अंगाने व्हायला हवी.

सविस्तर वाचा..

13:09 (IST) 20 Apr 2023
अमरावती: बदल्यांसाठी अपंग झालेल्या शिक्षकांची विशेष समिती करणार तपासणी!

अमरावती : जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली व पदस्थापना घेण्यासाठी शिक्षकांनी बनावट दुर्धर आजार आणि अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आल्‍यानंतर विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तत्काळ विशेष समिती द्वारे चौकशी करून अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सविस्तर वाचा

12:41 (IST) 20 Apr 2023
मुंबई: रखडलेल्या ५१७ झोपु योजना कार्यान्वित करण्यात तूर्त अडचण!

मुंबईतील रखडलेल्या ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सुरुवात केली असली तरी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या ही प्रक्रिया थंडावली आहे. आता प्रत्येक योजनेनुसार स्वतंत्र नोटीस दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा

12:35 (IST) 20 Apr 2023
नाशिक: संकेतस्थळातील तांत्रिक अडचणींमुळे पालकांना माहिती मिळण्यास अडथळा; आरटीई प्रवेश प्रक्रिया

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली असतांना जिल्ह्यात किती प्रवेश झाले, याची माहिती संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींमुळे मिळण्यात अडथळा येत आहे.

सविस्तर वाचा

12:22 (IST) 20 Apr 2023
गौतम अदाणींनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट!

गेल्या काही काळापासून शरद पवारांनी गौतम अदाणींच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं. या पार्श्वभूमीवर गौतम अदाणींनी आज सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली आहे. तब्बल दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

12:22 (IST) 20 Apr 2023
उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल दुरुस्तीची प्रतीक्षाच? पावसाळ्यापूर्वी काम अशक्य

उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र भरतीचे पाणी आणि धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.

सविस्तर वाचा

12:21 (IST) 20 Apr 2023
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: शेवटच्या दिवसापर्यंत ५९ हजार अर्ज सादर; ४० हजार जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांसाठी (१४ भूखंडांसह) अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याची मुदत बुधवारी रात्री ११.५९ वाजता संपली. अखेरच्या दिवशी ५९ हजार ५८ इच्छुकांनी अर्ज भरले. यापैकी ४० हजार ४५४ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले असून आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज जमा करण्याची मुदत शुक्रवारी रात्री ११.५९ मिनिटांनी संपणार आहे.

सविस्तर वाचा

12:02 (IST) 20 Apr 2023
…तर इम्तियाज जलील यांना अटक करावी – अंबादास दानवे

संभाजीनगरमधीर राड्याला पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. पोलीस आयुक्त दोन तास कुणाशीही संपर्क साधलेला नाही. अनेक अधिकाऱ्यांचे फोन उचललेले नाहीत. इम्तियाज जलील यांनी दंगल पेटवली असेल, तर भाजपानं त्यांच्यावर कारवाईची मागणी करावी. पोलिसांकडे तक्रार करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अटक करावी त्यांना. माझं सर्टिफिकेट कशाला मागताय? मी कोण आहे? – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेत विधानपरिषद

11:49 (IST) 20 Apr 2023
अमरावतीच्या ‘पीएम मित्रा पार्क’मधील गुंतवणूक संधींबाबत एमआयडीसीचे चर्चासत्र संपन्न

मुंबई : भारत सरकारने पीएम मित्रा (मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल आणि ॲपरल) पार्क उपक्रमाचा एक भाग म्हणून एकात्मिक वस्त्रोद्योग संकुलाची निर्मिती करण्याची घोषणा केली, त्यापैकी महाराष्ट्रात अमरावती येथे टेक्सटाईल पार्कला मंजुरी मिळाली आहे. हे टेक्सटाईल पार्क नांदगाव पेठजवळ साकारले जात असून, हे अमरावती पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क १,०२० एकर क्षेत्रफळावर उभारण्यात येईल.

सविस्तर वाचा..

11:48 (IST) 20 Apr 2023
पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीत आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे जेरबंद

पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

सविस्तर वाचा..

11:48 (IST) 20 Apr 2023
पुणे : रॅप गाणे प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाकडून उच्च स्तरीय समिती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीत केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले.

सविस्तर वाचा..

11:47 (IST) 20 Apr 2023
संरचना मजबुतीचे प्रमाणपत्र १५ दिवसांत सादर न केल्यास फौजदारी कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांचा जाहिरात फलकधारकांना इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा ४३३ आणि अधिकृत एक हजार ४०७ लोखंडी जाहिरात फलकधारकांनी येत्या १५ दिवसांत संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र, जाहिरात फलकाच्या दहा बाय आठ इंचाच्या छायाचित्राच्या दोन प्रती आकाशचिन्ह व परवाना विभागात सादर कराव्यात अन्यथा संबंधित फलक मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा..

11:46 (IST) 20 Apr 2023
पुण्यात घरांची विक्री ‘जैसे थे’; वाढत्या किमतीचा खरेदीवर परिणाम

पुणे : पुण्यात मार्च महिन्यात १४ हजार ३०९ घरांची विक्री झाली. फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात वाढ नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, मुद्रांक शुल्क संकलनात २० टक्के वाढ झालेली आहे. मार्च महिन्यात एकूण ९ हजार २१५ कोटी रुपयांच्या मूल्याच्या घरांची नोंदणी झाली असून, त्यातून ६२१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. घरांच्या किमती वाढल्याचा परिणाम विक्रीवर झालेला आहे.

सविस्तर वाचा..

11:46 (IST) 20 Apr 2023
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मिळवले ‘आयएसओ’ मानांकन

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस ‘आयएसओ २७००१-२०१३’ हे मानांकन मिळाले आहे. बँकेने संगणक प्रणालीचे पायाभूत मजबुतीकरण केले असून, यासाठी हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक प्राप्त झाले आहे.

सविस्तर वाचा..

11:45 (IST) 20 Apr 2023
पुणे : रेल्वेचा आता पंचतारांकित विश्रांतीकक्षाचा घाट

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांना मूलभूत सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी रेल्वेने आता सशुल्क पंचतारांकित विश्रांतीकक्ष उभारण्याचे नियोजन केले आहे.

सविस्तर वाचा..

11:42 (IST) 20 Apr 2023
नागपूर: संतापजनक! चार वर्षीय भाचीवर मामाने केला लैंगिक अत्याचार

घरात मैत्रिणीसह खेळत असलेल्या चार वर्षीय भाचीवर मावसमामाने लैंगिक अत्याचार केला. ही घृणास्पद घटना कळमन्यात उघडकीस आली. विष्णू (२८) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय मुलगी ही आईसह राहते.

सविस्तर वाचा

11:41 (IST) 20 Apr 2023
अमरावती: ‘आयपीएल’वर सट्टा; गोवा येथून एकास अटक

इंडियन प्रिमियर लिगमधील सामन्यांवरील सट्टा प्रकरणी एका आरोपीस विशेष पथकाने गोवा येथून अटक केली. अनेक सट्टेबाज पोलिसांच्या नजरेत असून लवकरच त्यांनाही अटक होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

सविस्तर वाचा

11:41 (IST) 20 Apr 2023
बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी – दानवे

बावनकुळेंना महाविकास आघाडीची चिंता कधीपासून वाटायला लागली? त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी. विनोद तावडेंचा अहवाल, केंद्रीय नेत्यांचं महाराष्ट्रातील नेत्यांशी वर्तन याची त्यांनी काळजी करावी – अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते

11:41 (IST) 20 Apr 2023
चंद्रपूर: रणरणत्या उन्हात तीन हजार आदिवासी रस्त्यावरच; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू

अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापमानात हजारो आदिवासींनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसापासून पोंभुर्णा शहरातील मध्यभागी असलेल्या बसस्थानक चौकात ठिय्या दिला आहे.

सविस्तर वाचा

11:40 (IST) 20 Apr 2023
नाशिक: विहिरींच्या खोदकामात मुक्तहस्ते जिलेटीनचा वापर; स्फोटकांच्या बेकायदा वापराकडे यंत्रणांची डोळेझाक

नाशिक ग्रामीण भागात विहिरी खोदताना सर्रास जिलेटीन कांड्यांचा वापर होत असून ही स्फोटके वापरताना कुठल्याही स्थानिक यंत्रणेची परवानगी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. स्फोटकांचा वापर आणि साठवणुकीविषयक परवानगीचे अधिकार नागपूरच्या इंधन व विस्फोटक सुरक्षा संघटनेकडे (पेसो) आहेत.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 20 Apr 2023
नागपूरच्या वेशीवर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार नितीन देशमुखांचा गंभीर दावा!

जवळपास सकाळी ७ वाजता आम्हाला ताब्यात घेतलं. तिथून साडेसात ते पावणेआठ वाजता आम्हाला जबरदस्तीने गाडीत कोंडलं. पण आता आम्ही कोणत्या दिशेनं जात आहोत, आम्हाला कुठे नेत आहेत याची कोणतीही कल्पना आम्हाला देण्यात आलेली नाही. पोलिसांनी आमची पाण्याची व्यवस्था केली. पण आता साडेदहा-पावणे अकरा वाजले आहेत. आमच्यातले बरेच शुगरचे रुग्ण आहेत. उन्हाळ्याचा काळ आहे. कोणत्याही प्रकारची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पोलिसांचा जर पूर्वनियोजित कट होता, तर यांनी नाश्त्याची व्यवस्था करायला हवी होती. आम्हाला नाश्ताही न देण्याचा दबाव पोलिसांवर आहे. पोलीस म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही. गाडी कधी जंगलात थांबवतात, कधी रस्त्यावर थांबवतात, कधी ३० च्या वेगाने गाडी चालवतात. यांच्या मनात नेमकं काय आहे, हे कळत नाहीये. – नितीन देशमुख

10:54 (IST) 20 Apr 2023
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”!

खारघरमधील कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन अहवाल समोर आले आहेत.

वाचा सविस्तर

10:53 (IST) 20 Apr 2023
“देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?” संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; उष्माघात प्रकरणावरून टीकास्र!

संजय राऊतांनी खारघर उष्माघात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत आगपाखड केली आहे.

वाचा सविस्तर

10:51 (IST) 20 Apr 2023
खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत – संजय राऊत

खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. पण ज्या ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. हे फडणवीसांचं ढोंग आहे- संजय राऊत

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Political Live News Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!