Mahavikas Aghadi Rally Against Election Commission : “निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले आहेत”, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. काही वेळापूर्वी मनसेच्या मेळाव्यात त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला की “मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाहीत तोवर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी एक वर्ष थांबू. परंतु, तुम्ही आधी मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त करा.”

दरम्यान, राज यांनी यावेळी घोषणा केली की निवडणूक आयोगाविरोधात आणि सरकारविरोधात आपला लढा कसा असेल याची माहिती आज दुपारी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून दिली जाईल. त्यानुसार शिवसेना (उबाठा) भवन येथे सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षांनी घोषणा केली की येत्या १ नोव्हेंबर रोजी (शनिवार) राज्यातील सर्व विरोधी पक्ष विराट मोर्चा काढतील.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, काम्रेड प्रकाश रेड्डी उपस्थित होते.

१ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार

यावेळी संजय राऊत म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. जिल्ह्याजिल्ह्यातील, गावागावातील मतदानाचा अधिकार गमावलेले लोक या मोर्चाला येतील. मतदारांची ताकद देशाच्या पंतप्रधानांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना व निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे. तसेच आयोगाला व दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की इतका अन्याय होत असताना महाराष्ट्र स्वस्थ बसलेला नाही, अजगरासारखा पडून राहिलेला नाही. त्यांचं आव्हान स्वीकारायची आमची तयारी आहे.”

लोकशाहीसाठी महाराष्ट्र कसा लढतो ते देशाला दाखवून देऊ : राऊत

खासदार राऊत म्हणाले, “मुंबईत आम्ही जो मोर्चा काढणार आहोत त्याची वेळ आणि मार्ग लवकरच जाहीर करू. मोर्चाचं नेतृत्व करणारे आमचे प्रमुख नेते पुन्हा एकदा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देतील. मात्र, हा मोर्चा देश बघेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे सगळ्या देशाला आम्ही दाखवून देणार आहोत.”