Manoj Jarange On Maratha Reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषणही केलं. आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठकही पार पडली होती. मात्र, यानंतरही आरक्षणाच्या प्रश्नावर काहीही तोडगा निघाला नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून सातत्याने तारीख पे तारीख दिली जात आहे. सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

आता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केलं. “महाराष्ट्रात एवढ्या सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही”, अशी खोचक टीका करत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रत्युत्तर दिलं.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“लोकांचे डोके कोण भडकवंतय? त्यांचाच मित्र भडकवत आहे. मराठा समाज फक्त त्यांचा हक्क मागत आहे. जसं तुम्ही सागर बंगल्यावरील मित्राला रोज भेटता, ते डोके भडकवत आहेत. त्यांनी मराठा समाजाचे नेते विरोधात घातले आहेत. तसेच ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही फूस लावली. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाला दोष देण्याचं काम करू नका. ज्यांना आरक्षणाचं काही कळत नाही, त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही”, अशी खोचक टीका करत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा : Raj Thackeray on Reservation : “महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “माथी भडकवून…”

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो”, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

“बाहेरच्या राज्यातील तरुण-तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण-नोकऱ्या मिळवतात. या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाही, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आज जातीपातीचं प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात, असं ऐकलं होतं. आता हे लोन महाराष्ट्रात पोहोचलं आहे, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे”, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं.