विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. यासह राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्हही (पक्षचिन्ह) अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असं, शरद पवार गटाने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी (छगन भुजबळ, दिलीप मोहिते-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, इत्यादी) शिवसेना-शिंदे गट आणि भाजपाच्या युती सरकारमध्ये सामील होऊन मंत्रीपदं स्वीकारली. त्यानंतर शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले. खासदार, माजी मंत्री, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक नेत्यांना आपल्याबरोबर घेत अजित पवारांनी वेगळी चूल मांडली आणि मूळ पक्षावर दावा केला. परंतु, शरद पवार गटाने पक्षामध्ये फूट पडली नसल्याचा दावा केला होता. याचवेळी अजित पवार गटाकडून मूळ राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. शरद पवार यांची अध्यक्षपदावरील नियुक्ती बेकायदा असून अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत केंद्रीय निवडूक आयोगासमोर याप्रकरणी १० हून अधिक सुनावण्या झाल्या. स्वतः शरद पवारही यापैकी काही सुनावण्यांवेळी निवडणूक आयोगासमोर उभे राहिले.

सुनावणी काळात दोन्ही गटांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे आणि युक्तिवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला. शिवसेनेबाबतही निवडणूक आयोगाने असाच निष्कर्ष काढला होता. त्यामुळे विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा आयोगाने दिला.

हे ही वाचा >> ‘थकणार नाही, झुकणार नाही, कुणाला सांगताय म्हातारा झालोय’, राष्ट्रवादीने पोस्ट केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ

यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार गटातील नेत्यांपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams ajit pawar faction over snatching ncp from sharad pawar asc
First published on: 07-02-2024 at 08:04 IST