नांदेड : राज्यसभेचे दोन खासदार, त्यातील एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि प्रभावशाली नेते तसेच वेगवेगळ्या मतदारसंघात पाच आमदार अशा भक्कम बळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांतून जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त करण्याचा निर्धार करणार्‍या भारतीय जनता पार्टीने बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी पळ काढल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच पक्षातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नगरपालिकांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील एका पालिकेत भाजपाचे सर्व म्हणजे १७ उमेदवार एकीकडे बिनविरोध विजयी झाले असताना नांदेड जिल्ह्यात मात्र एका पालिकेत उमेदवार न देण्याची नामुष्की पक्षावर ओढवल्यामुळे समाजमाध्यमांतून त्यावर बरीच चर्चा होत आहे.

जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. या संस्थांमधील नगरसेवकपदाच्या २६९ जागांसाठी २ हजारांहून अधिक अर्ज तर १३ नगराध्यक्षपदांसाठी २१२ अर्ज दाखल झाले.

संघटनात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्या जिल्ह्यात सर्वात मोठा असलेल्या भाजपाने हदगाव नगरपरिषदेपूरती शिवसेनेसोबत युती करून तेथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला नाही. पण बिलोलीमध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्व जागांसाठी पक्षाकडे उमेदवार असतानाही ही नगरपालिका या पक्षाने एका वादग्रस्त माजी नगराध्यक्षासाठी सोडून दिल्यानंतर पक्षामध्ये बरीच खळखळ झाली आहे.

तेलंगणाच्या सीमेवरील बिलोली नगरपरिषदेत मागील काळात काँग्रेस, समाजवादी गट किंवा स्थानिक आघाडीचे प्राबल्य राहिले. पण मागील काही वर्षांत भाजपाने तेथे जम बसवला. याच तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या डॉ.अजित गोपछडे यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली. नंतर देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात याच पक्षाचे जीतेश अंतापूरकर आमदार झाले. असे असताना बिलोली नगर परिषदेतून पक्षाने अनाकलनीयरित्या माघार घेतली. तसेच याच भागातील कुंडलवाडी आणि देगलूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासाठी कसेबसे दोन उमेदवार उभे केल्यानंतर या तीनही ठिकाणी भाजपाला वाव नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिलोलीचे एक माजी नगराध्यक्ष हे खा.अशोक चव्हाण यांच्या निकटच्या वर्तुळात वावरतात. त्यांच्या पत्नीनेही काही काळ नगराध्यक्षपद भूषविले होते. या दोघांच्याही कारकिर्दीत बिलोली पालिकेमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला. चौकशीमध्ये ते दोषी आढळले होते. या माजी नगराध्यक्षांनी आपल्या समर्थकांनी एक आघाडी तयार करून भाजपाने बिलोलीत आपल्या चिन्हावर निवडणूक न लढवता आपल्या आघाडीला पाठबळ द्यावे, अशी योजना आखली.

त्यांची योजना नांदेडमधील भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने उचलून धरली आणि ती पक्षनेत्यांकडून मान्य करून घेतल्यामुळे भाजपातर्फे निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांची रविवारी मोठी कोंडी झाली होती. पण या कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याचा आपला मनोदय कळवताच या पक्षाचे नेते माजी खा.भास्करराव खतगावकर यांनी अवघ्या १२ तासात पुढील जुळवाजुळव केल्यामुळे भाजपाची मोठी कोंडी झाली आहे.

भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या या आत्मघातकी निर्णयाबद्दल पक्षाचे काही पदाधिकारी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. वरील निर्णय घेण्यापूर्वी भाजपाच्या राज्य पातळीवरील निवडणूक प्रमुखांची मान्यता स्थानिक नेत्यांनी घेतली होती का, ते अद्याप समोर आलेले नाही. भाजपाचे राज्यसभा सदस्य अजित गोपछडे हे बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र आहेत.

खासदार झाल्यानंतर त्यांनी बिलोली आणि देगलूर तालुक्याकडे आपले लक्ष केंद्रीत केल्याचे मागील काही महिन्यांमध्ये दिसत होते. या दोन्ही तालुक्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. अलीकडे त्याचा बराच गाजावाजा करण्यात आला.

पण खा.गोपछडे आणि आ.अंतापूरकर या दोघांनाही आपल्या प्रभावक्षेत्रातील नगरपरिषदांमध्ये ना भक्कम जुळवाजुळव करता आली, ना सक्षम उमेदवार देता आले. त्यांच्या कार्यक्षेत्रातील तीन नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी यांच्यातच आता लढत रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.