Amol Mitkari : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. या निकालानंतर आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. पण निकाल जाहीर झाल्यानंतर आज तब्बल पाच दिवस झाले आहेत. पण तरीही सरकार स्थापन झालेलं नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी नेमकी अडचणी काय आहेत? याबाबत विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. महायुतीच्या या तिन्हीही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीचं सरकार कसं असणार? मंत्रिमंडळ कसं असणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जाणार? अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाबाबत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं? हे लवकरच कळणार आहे. मात्र, असं असलं तरी अजित पवारांनी हे दिल्लीत दाखल होत अमित शाह यांची भेट घेताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक पोस्ट एक्सवर (ट्विटर) केली आहे. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री कोण होणार? हालचालींना वेग; दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही पदापेक्षा…”

अमोल मिटकरीचं ट्वीट काय?

“जंगल मे सन्नाटा छायेगा, जल्द ही शेर वापस आयेगा…#COMING_SOON”, अशा सूचक आशयाचं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यांच्या या पोस्टचा नेमकी अर्थ काय? या पोस्टमधून नेमकं काय सुचवायचं आहे? याबाबत अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत.

दिल्लीतील बैठकीबाबत एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“आता बैठकीसाठी मी जात आहे. बैठकीत जी काही चर्चा होईल ते मी सांगणार आहे. आमची बैठक सकारात्मक होईल. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली. आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही. लाडक्या बहिणींबाबत देखील मी पत्रकार परिषदेत बोललो. आता लाडक्या बहिणींचा भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे. लाडका भाऊ ही ओळख माझ्या सर्व पदापेक्षा मोठी आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळासह सविस्तर चर्चा होईल आणि बैठकीत काय चर्चा झाली हे देखील सांगेल. अजित पवार हे देखील बैठकीला येणार आहेत. ते आधी आल्यामुळे त्यांची पक्षांची बैठक झाली असेल”, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla amol mitkari on ajit pawar devendra fadnavis eknath shinde amit shah meeting maharashtra assembly election 2024 gkt