विधानसभेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने राज्यातील २८८ जागांवर सर्व्हे सुरु केला असल्याची माहिती सांगितली जाते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही सर्व जागांवर सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे येणाऱ्या आमदार आणि इच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल देशमुख काय म्हणाले?

खासदार सुनेत्रा पवार यांनी आज मोदी बागेत दाखल होत नेमकी कुणाची भेट घेतली? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर अनिल देशमुख म्हणाले, “खासदार सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्या असतील तर याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, मोदी बागेत अनेक फ्लॅट आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक राहतात. त्यामुळे त्यांनी कोणाची भेट घेतली याबाबत काही माहिती नाही. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे सर्वांना माहिती आहे. छगन भुजबळ हे आधी एक दिवस शरद पवार यांच्यावर टीका करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला जातात”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार’, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

देशमुख पुढे म्हणाले, “अजित पवार गट २८८ जागांचा सर्व्हे करणार आहे. पण याबाबात काही नवल वाटण्याचं कारण नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हीही आमचा सर्व्हे करणार आहोत. सर्व्हे केल्यानंतर कोणती जागा कोणाला लढवायची याची माहिती समजते”, असंही देशमुख म्हणाले.

अजित पवारांनी निलेश लंके हे आमच्याकडून लोकसभा लढवण्यास तयार होते, असं विधान केलं होतं. त्यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “निलेश लंके यांना अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवण्याचा प्रश्नच नाही. निलेश लंके हे स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना लोकसभा लढवायची होती, हे त्यांना माहित होतं. त्यांचा आधीपासूनच शरद पवार गटात येण्याचा ओढा होता. निलेश लंके शरद पवार गटात येणार होते, हे सर्वांना माहित होतं. आता ज्यावेळी निलेश लंके उमेदवार होते, त्यावेळी अजित पवार त्यांना काय काय बोलले? हे सर्वांना माहिती आहे. कसा निवडून येतो? पाहून घेईन, असं ते बोलले होते”, अशी टीका अनिल देशमुखांनी अजित पवारांवर केली.

तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर देशमुख म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचा अजित पवार गटाला बाजूला करण्याचा प्रयत्न आहे का? अजित पवार गटापासून आपल्याला काही फायदा होत नाही मग त्यांना बाजूला करायचं. भाजपा सांगू शकते की, एकनाथ शिंदे तुम्ही वेगळं लढा आणि अजित पवार गट वेगळं लढेल. मग निवडून आल्यानंतर पाहू, कोणाची उपयुक्तता संपली तर भारतीय जनता पक्ष काहीही करु शकते”, असा हल्लाबोल अनिल देशमुखांनी केला.

आमच्याकडे उमेदावारांची रिघ लागली

“आमचा पक्षही २८८ जागांचा सर्व्हे करत आहे. यामुळे कोणत्या जागांचा बदल करावा लागेल, याचा आढावा आपल्याला या निमित्ताने येतो. तसेच मित्र पक्षांशी याबाबत योग्य ती चर्चा करता येते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात आमदार किंवा इच्छुक उमेदावारांची रिघ लागली आहे. त्यामुळे सर्वांची चाचपणी करुन पक्ष योग्य तो निर्णय घेऊल”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group anil deshmukh on assembly elections politics and bjp shivsnena ncp ajit pawar group gkt