आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय नेते मंडळी देखील विविध मतदारसंघाचा दौरा करत आढावा घेत आहेत. तसेच विविध ठिकाणी सभा, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती आखत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षामध्ये सध्या जागा वाटपाची खलबतं सुरु आहेत.
आता जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “जेव्हा आपण विचार बदलतो तेव्हा लोक देखील लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला टोपी घालतात. महायुतीत अजित पवारांना २० ते २२ जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय राहिला”, अशी टीका रोहित पवार यांनी केली. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
रोहित पवार काय म्हणाले?
“आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अनेक लोक जेवणाच्या पंगतीवर पंगती करतील. पण काम न करता फक्त काही लोकांनी भ्रष्टाचार केला असेल आणि जर फक्त पंगतीवर राजकारण करत असतील तर त्यांची राजकीय पंगत लोक नक्कीच उठवतील”, असा सूचक इशारा रोहित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांना दिला.
हेही वाचा : Ajit Pawar Group : “…मग तेव्हा ते कपट कोणाचं होतं?” संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवार गटाचं प्रत्युतर!
चेतन तुपे संपर्कात आहेत का?
आज शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे पुण्यातील एका कार्यक्रमात एका मंचावर दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर चेतन तुपे संपर्कात आहेत का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला असता रोहित पवार म्हणाले, “आता निवडणूक अवघड चालली आहे, असं काही त्यांना जाणवायला लागलं असेल. पण या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू कळतील. आता मी एक सांगतो की, आम्हाला शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला लोकसभा निवडणूक ही मनापासून लढायची आहे. आताही विधानसभा तशीच लढवायची आहे आणि जिंकायची आहे. कोण पक्षात येईल किंवा नाही, यापेक्षा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांनी म्हटलं, “शरद पवार यांनी आता अशी भूमिका घेतल्याचं जाणवतं की निष्ठावतांना जास्त महत्व द्यायचं. त्यानंतर जे कोणी पक्षात येत आहेत किंवा पक्षात घेण्यासारखे कोणी आहेत, त्यांना पक्षात घेण्यास काही हरकत नाही”, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “जेव्हा आपण विचार बदलतो तेव्हा लोक देखील लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला टोपी घालतात, हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं”, असा टोला रोहित पवारानी अजित पवारांना लगावला.
अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार गटाला किती जागा मिळतील, याबाबत रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटाला जर २०-२२ जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता अजित पवारांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टी हे मुद्दामहूनही करते की काय? हे आपल्याला सांगता येणार नाही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना किती जागा मिळतात ते पाहू. मात्र, आम्हाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणायचंच आहे. असा आमचा विचार असून आमच्या नेत्यांचाही हाच विचार आहे”, रोहित पवार म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd