उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाचं भाषण ऐकायची उत्सुकता? पंकजा मुंडे म्हणाल्या,"मी या गोष्टीतून गेले आहे..." | Pankaja Munde comment on Dasara Melava of Uddhav Thackeray Eknath Shinde | Loksatta

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाचं भाषण ऐकायची उत्सुकता? पंकजा मुंडे म्हणाल्या,”मी या गोष्टीतून गेले आहे…”

पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोणाच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे,असा प्रश्न विचारण्यात आला.

Pankaja Munde Uddhav Thackeray Eknath Shinde
उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे व एकनाथ शिंदे

Pankaja Munde Dasara Melava : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज (५ ऑक्टोबर) दसऱ्यानिमित्त ठाकरे गट आणि बंडखोर शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपआपल्या दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दोन्हीपैकी कोणत्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे,असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. पंकजा मुंडे भगवान गडावरील दसरा मेळाव्याआधी माध्यमांशी संवाद करत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सकाळीच सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण ऐकलं. सकाळी उठल्या उठल्या चांगला संदेश हा मिळाला की, त्या कार्यक्रमाची प्रमुख एक महिला होती. महिलांना काहीतरी स्थान मिळालं हा एक शुभ संकेत होता. मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते.”

“खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा”

“दुसरीकडे एकदम वेगळा दसरा मेळावा जिथं खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा आहे. त्यामुळे हे तीन वेगवेगळे मेळावे होत आहेत आणि मोहन भागवत यांचं मार्गदर्शन असा हा दिवस वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे. जनता हुशार आहे, ते सर्व पाहत आहेत,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

“”शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते, कारण…”

“शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्याचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्ही सावकरगावचं आमचं भगवान बाबांचं मंदिर बघितलं पाहिजे. आम्ही अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर उभं केलं आहे. तसंच मी या दोघांकडे कुतुहलाने बघते. आज त्यांच्यासाठी सिमोल्लंघनाचा खरा दिवस आहे. ते विषयांचं आणि जनतेच्या प्रश्नांचं सीमोल्लंघन करतील अशी अपेक्षा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

दसरा मेळाव्यात काय बोलणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दसरा मेळाव्यातील भाषणाचे मुद्दे मी ठरवलेले नाहीत. पुढील दोन तासात तुम्हाला ते कळतील. या वर्षभरात अनेक घटना असतात. त्या घटनांमध्ये माझ्यावर राज्यभरात प्रेम करणारे भाऊ सैनिकाप्रमाणे उभे राहतात. त्या घटनांवर माझ्या तोंडून थेट बोललं गेलं तर त्यांना आधार वाटतो. या वर्षभरात जे काही झालं त्यावर आम्ही दसरा मेळाव्यात बोलतो.”

“या मेळाव्याचा विषय केवळ जिल्ह्याचा नाही”

तसेच भविष्यात वर्षभर आपण काय करायचं यावर काही सूचना वजा विनंती करते. तशीच वर्षभर आम्ही आमची वाटचाल करत असतो. हा दसरा मेळावा राज्यभरातील लोकांसाठी असतो. देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा, वाशी, जळगाव, अगदी पश्चिम महाराष्ट्रातून लोक येतात. त्यामुळे या मेळाव्याचा विषय केवळ जिल्ह्याचा नसून राज्यातील प्रमुख वंचितांचा असतो,” असं मत पंकडा मुंडेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अनेकदा डावलल्याची आणि नाराजीची चर्चा, पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? त्या म्हणाल्या, “वर्षभरात…”

“त्यांना काय ऐकायचं आहे ते मला द्यावं लागतं”

“मागीलवेळी मी जाहीर केलं होतं की आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. ते सत्यात उतरलं आहे. ते आमच्यासाठी आनंद साजरा करण्याचा मुद्दा आहे. या मेळाव्यात जो प्रचंड उत्साह असतो. त्यामुळे त्यांना काय ऐकायचं आहे ते मला द्यावं लागतं,” असंही मुंडेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-10-2022 at 12:44 IST
Next Story
“उद्धव ठाकरे बावचळलेल्या अवस्थेत…”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “त्यांचा संयम सुटलाय!”