राहाता: यात्रा काढून नव्हे तर, विकास आणि विश्वासातून देशाला एकत्रित जोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधकांची टीका आणि स्वत:च्या आईवर झालेल्या टीकेनंतरही कर्तव्यापासून दूर न गेलेल्या प्रधानमंत्र्यानी आत्मनिर्भरतेने देशाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सुरू केलेल्या जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत राहाता येथे करण्यात आला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, आमदार विठ्ठलराव लंघे आमदार काशिनाथ दाते आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर व शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात तसेच लाभार्थी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, देशातील २५ कोटी जनता गरिबी रेषेच्यावर आणण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांमुळे होऊ शकले. देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य आणि आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहे. मागील अकरा वर्षांच्या कार्यकाळात सुरू झालेली एकही योजना बंद झालेली नाही. रस्ते आणि रेल्वे विकासातून देशाला विकासाचे पर्व मोदीनी दाखवले. पहेलगाम घटनेनंतर भारताने आपले कर्तृत्व संपूर्ण जगाला दाखवून दिले. आत्मनिर्भरतेने भारताने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मोदींच्या आईचा अपमान केला जातो, पण विचलित न होता राष्ट्राला प्रथमस्थानी नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मोबाइलपासून ते सेमीकंडक्टरच्या निर्मितीत इतर देशांनाही भारताने मागे टाकले. वस्तूवरील कर कमी केल्यामुळे जनतेला मोठा दिलासा व अर्थव्यवस्थेलाही पाठबळ मिळेल.

महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अकराशे योजनांची अंमलबजावणी ऑनलाइन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. अहिल्यानगर जिल्हा योजनांच्या अंमलबजावणीत राज्यात अग्रेसर आहे. याप्रसंगी खासदार वाकचौरे, अण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.