राज ठाकरेंची एक मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा प्रत्यक्ष भाषणाआधीच जोरदार चर्चेत आली आहे. आधी सभेला परवानगी मिळण्यावरून वाद सुरू झाला होता. आता परवानगी मिळाल्यानंतर देखील सभेला विरोध केला जात असून पोलिसांनी घातलेल्या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. भीम आर्मीनं याआधीच राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला असताना आता त्यांच्या या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठासमोर राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेविरोधात याचिका दाखल केली आहे. सभा रद्दच करण्यात यावी, अशी ठाम मागणी करतानाच सभा झालीच, तर पोलिसांच्या अटींचं काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याची भूमिका जयकिशन कांबळे यांनी मांडली आहे.
याआधीच भीम आर्मी संघटनेनं सुरुवातीपासून राज ठाकरेंच्या या सभेला विरोध दर्शवला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पुन्हा एकदा सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. “१ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. ती सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असं ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन युवा मोर्चाकडून थेट जनहित याचिकाच दाखल करण्यात आली आहे.
“जर राज ठाकरेंनी पोलिसांच्या १६ अटींचं उल्लंघन केलं, तर त्याच सभेत…”, भीम आर्मीनं दिला मनसेला इशारा!
“…तर सभा रद्द करा!”
“औरंगाबाद शहर हे संवेदनशील आहे. ४८ तासांवर रमजान ईद आली आहे. राज ठाकरेंच्या सभांमधून दोन समूहांमध्ये तेढ निर्माण होत आहे. मशिद, भोंगा, नमाज यावरच त्यांचं भाषण सुरू आहे. हे भाषण निंदनीय आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारं भाषण आहे. औरंगाबाद शहरात होणाऱ्या सभेला आमचा विरोध नाही. आमचं एकच म्हणणं आहे की सभेमुळे दोन समूहांमध्ये तेढ निर्माण होत असेल तर ती सभा रद्द होणं गरजेचं आहे”, असं जयकिशन कांबळे म्हणाले आहेत.
“पोलिसांनी आधी भाषण पाहावं”
दरम्यान, राज ठाकरेंचं भाषण आधी पोलीस आयुक्तांनी तपासावं आणि नंतर प्रक्षेपित करावं, अशी देखील मागणी करण्यात आली आहे. “राज ठाकरे जे भाषण करणार आहेत ते पोलीस आयुक्तांनी तपासून घ्यावं. त्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारा कुठला मुद्दा नसेल, तर ते भाषण थेट प्रक्षेपित करावं. चुकून किंवा मुद्दामून त्यांच्या तोडून कुठलं वक्तव्य निघालं, तर त्यातून महाराष्ट्र पेटू शकतो”, असं जयकिशन कांबळे म्हणाले आहेत.