गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसंदर्भात बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. मनसेचा पाडवा मेळावा आणि त्यापाठोपाठ ठाण्याच झालेल्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून अजूनही राज्यातलं राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेल का? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर या सभेला परवानगी मिळालेली आहे. मात्र, सभेसाठी तब्बल १६ अटी पोलिसांकडून घालण्यात आल्या आहेत. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परवानगी मिळाल्यानंतर पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंच्या सभेला आज परवानगी देण्यात आली असून दुपारी ३.३० ते रात्री ९.४५ या कालावधीमध्येच सभेचं आयोजन करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यासोबतच, सभेमध्ये वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये असं देखील नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, सभेसाठी १५ हजार लोकांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करता येणार नाही, असं देखील परवानगीपत्रात दिलेल्या अटीमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधली सभा रेकॉर्डब्रेक होईल, असा दावा करणाऱ्या मनसेसाठी ही अट अडचणीची ठरू शकते. यासंदर्भात विचारणा केली असता बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर सशर्त परवानगी; निमंत्रितांचा आकडा, चिथावणीखोर वक्तव्य याबाबत अटींचा समावेश!

“येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही. जेवढे लोक येतील, तेवढ्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं त्याबाबत पोलिसांशी सहकार्याने आम्ही काम करू. उद्या दुपारी यासंदर्भात पोलिसांसोबत आमची बैठक आहे”, असं नांदगावकर म्हणाले. 

अटींचं पालन केलं जाईल!

दरम्यान, यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे. “आयुक्तांनी जी परवानगी दिली आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की त्यांनी घातलेल्या अटींचं नक्कीच पालन केलं जाईल. कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे. ते नक्कीच पाळलं जाईल”, असं ते म्हणाले.
“पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करणार. त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच. आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही. कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात. कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील. पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं. त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

“इतरांच्या सभेला माणसं आणावी लागतात”

दरम्यान, इतर नेत्यांच्या सभेला सहज परवानगी मिळत असताना राज ठाकरेंच्या सभेलाच परवानगी सहज का मिळत नाही? अशी विचारणा केली असता बाळा नांदगावकर यांनी यावरून टोला लगावला. “इतरांच्या सभेला माणसं आणावी लागतात, आमच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत. सर्वच पक्षांचे लोक राज ठाकरेंच्या सभेला येतात. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहावं लागतं. त्यामुळेच आमच्या पत्रकार परिषदेसाठी लगेत परवानगी मिळत नसावी”, असं ते म्हणाले.