Ramdas Kadam On Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे सध्या राज्यभरात दौरे सुरु आहेत. एकीकडे महायुतीचे नेते ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही दौरे आणि सभा सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काँग्रेसची साथ सोडा. मी दोन तासांत आमदारांना परत ‘मातोश्री’वर आणतो. पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते दापोलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
रामदास कदम काय म्हणाले?
“शिवसेनेचे आमदार ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं की, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा आणि संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पत्रकार परिषद घ्या आणि सांगा. त्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांना खासगी विमानाने दोन तासांत ‘मातोश्री’वर नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही. उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतोय हे शंभर टक्के खरं आहे. मग त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले हो मी तुम्हाला फोन लावून सांगतो. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार ‘मातोश्री’वर पोहोचले आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय बदलला. त्यानंतर मलाही उद्धव ठाकरेंनी निरोप दिला की, आम्ही कायदेशीर लढाई लढू”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
कदम पुढे म्हणाले, आम्हाला महायुती टिकवायची आहे. समजा जर कुणी चुकत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. अनेकांना गद्दारीची व्याख्या कळली नाही. आम्ही गद्दारी केलेली नाही. खरं तर गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनीच केलेलं आहे. गद्दारांना बरोबर घेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं”, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच यावेळी रामदास कदम यांनी महायुतीबाबत बोलताना काहीसी मवाळ भूमिका घेतल्याचंही दिसून आलं.
…म्हणून उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला
“शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मी सांगितंल होतं काँग्रेसची साथ सोडा. मात्र, त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून निर्णय बदलला”, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd