सातारा : साताऱ्यातील आठ पालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची घोषणा केली. सातारा जिल्ह्यात सातारा पालिकेसह कराड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर, मेढा या दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील ११५ प्रभागांतून २३३ नगरसेवक हे जिल्ह्यातील मतदारांना निवडून द्यावयाचे आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातील १३९, अनुसूचित जातीमधील ३२, इतर मागास प्रवर्गातील ६० आणि अनुसूचित जमातीमधील दोन असे नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. सातारा पालिकेच्या सर्वाधिक ५०, कराड ३१, वाई २३, फलटण २७, महाबळेश्वर पाचगणी रहिमतपूर म्हसवड यांच्या प्रत्येकी २०, मेढा नगरपंचायतीच्या १७ तर मलकापूर नगरपंचायतीच्या २२ जागांवर निवडणूक होणार आहे.

निवडणुका जाहीर झाल्याने भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार व शिवसेना शिंदे पक्षाच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. भाजपची धुरा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार घोरपडे यांच्यावर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्याकडे व शिवसेना शिंदे पक्षाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीसाठी दि. १० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदान २ डिसेंबर रोजी तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्ह्यात ११५ प्रभागांतून २३३ उमेदवार मतदारांना निवडून द्यावयाचे आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेत राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायती यांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. यानुसार सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापुढे पालिका कार्यक्षेत्रामध्ये नवीन घोषणा तसेच जाहीर कार्यक्रम यांना मर्यादा येणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करणे १० नोव्हेंबरपासून सुरू होत असून १७नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी छाननी आणि माघार घेण्याची अंतिम मुदत ही २१ नोव्हेंबर आहे. २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप, त्यानंतर लगेच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.