शरद पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला धावून; नेमकं काय घडलं?

“संजय राऊत जे आमच्या मतांवर निवडून आले आणि आता आम्हाला…”

ajit pawar shambhuraje desai
शरद पवारांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला; नेमकं काय घडलं?

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गिरणा अ‍ॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून गोळा केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. याला आज ( २१ मार्च ) दादा भुसेंनी विधानसभेत प्रत्युत्तर देत संजय राऊतांनी माफी मागण्याची मागणी केली.

दादा भुसे काय म्हणाले?

विधानसभेत स्पष्टीकरण देताना दादा भुसेंनी सांगितलं, “आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेच निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्वीट केलं. जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्वीटची चौकशी करण्यात यावी. त्या चौकशीत मी दोषी आढळलो, तर आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईल. जर यात खोट आढळून आलं, तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा.”

हेही वाचा : “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?

“तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक…”

“हे भाकरी ‘मातोश्री’ची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. २६ मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे.

“…ते रेकॉर्डवरून काढण्यात यावं”

यावेळी बोलताना दादा भुसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. “तुम्हाला मांडायचं ते मांडा. पण, आमच्या पक्षाच्या प्रमुखांचं नाव घेण्याची गरज नाही. दादा भुसेंनी जे सभागृहात म्हटलं, ते रेकॉर्डवरून काढण्यात यावं,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

“साखर उद्योगाच्या संदर्भात शरद पवारांचं योगदान सर्व देशानं पाहिलं”

राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी दादा भुसेंना शरद पवारांचा कोणताही अवमान करण्याचा उद्देश नव्हता, असं सांगितलं. “शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रसह देशाला आदर आहे. राज्याचं नेतृत्व शरद पवारांनी देशात केलं. कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय आम्हाला माहिती आहे. साखर उद्योगाच्या संदर्भात शरद पवारांचं योगदान सर्व देशानं पाहिलं आहे.”

“पण, दादा भुसेंनी केलेलं विधान संजय राऊत जे आमच्या मतांवर निवडून आले आणि आता आम्हाला डुक्कर, गटारातील पाणी, प्रेत असं बोलतात, त्यांच्याबद्दल आहे,” असं शंभूराज देसाईंनी म्हटलं.

हेही वाचा : “भारतात ५६ इंचांची छाती असणारे पंतप्रधान असताना…”; ब्रिटनमधील तिरंग्याच्या अपमानावरून ठाकरे गटाचं टीकास्र!

“संजय राऊतांच्यात हिंमत असेल, तर…”

“शरद पवारांबाबत दादा भुसेंनी अनुद्गार काढले नाहीत. मात्र, आमच्याबद्दल कोणी काहीही बोललं, तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या मतांवर निवडून आलेले जे महागद्दर आहेत, त्यांना आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांबाबत आदर असून, कोणताही अवमान करण्याचा उद्देश नाही. संजय राऊतांच्यात हिंमत असेल, तर राजीनामा देत परत निवडून यावे,” असं आव्हान शंभूराज देसाईंनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 14:08 IST
Next Story
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात धमक्यांचे तीन फोन आल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू
Exit mobile version