लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांना १९९९ पासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत होतं, अशी टीका केली होती. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चं मडकं आहे’, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, “पुरवठा करण्यासाठी येत असतील. दुसरे त्यांच्याकडे आहे तरी काय? मते तर नाहीत. डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वत:चं काहीतरी असावं लागतं. जी शिवसेना तुम्ही मोदी आणि शाह यांच्या मदतीने चोरली, त्यांच्यामागे लोकांनी का उभं राहावं? अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची लोकसभेला एकही जागा येणार नाही. त्यांनी काहीही केलं तरी लोकं त्यांना मतदान देणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ठाण मांडलं आहे. अमित शाह सारखे येवून जाऊन आहेत. पण याचा काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान ३५ जागा जिंकेल”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का?”, ठाकरेंचा मोदींना थेट सवाल; म्हणाले “महाराष्ट्राच्या वाऱ्या…”

“अजित पवार यांच्या उमेदवारांची निवडणूक पार पडली. आता एकनाथ शिंदे यांच्या काही उमेदवारांची निवडणूक बाकी आहे. त्यांची अखेरची फडफड आहे. मुळात डॅमेज होण्यासाठी त्यांच्याकडे काही शिल्लख नाही”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केला. ते पुढे म्हणाले, “८०० कोटींच्या घोटाळ्याबाबत मी १४ तारखेला मुंबईत पुराव्यासह सर्व माहिती समोर आणणार आहे. ८०० कोटींचा हा भूसंपादन घोटाळा आहे. नाशिक महापालिका आणि नगरविकास मंत्रालय आणि नाशिकमधील काही स्थानिक पुढाऱ्यांनी मिळून ८०० कोटींची लूट कशी केली, हे उघड करणार आहे”, असं राऊत म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला काळू बाळूंचा तमाशा अशी टीका केली होती. यावर संजय राऊत म्हणाले, “काळू बाळूंचा तमाशा हा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक ताकद होती. काळू बाळूंनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागं करण्याचं काम केलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या लोकांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना काळू बाळू कोण आहेत हे माहिती नाही. त्यांनी अभ्यास करावा. हा तमाशा असला तरी त्याची थाप तुमच्या कानाखाली पडली आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले.

हेही वाचा : “मी मोदी सरकारला गजनी सरकार म्हणतो”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सगळ्या भाकडकथा…”

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांना १९९९ पासून मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर राऊत म्हणाले, “आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची स्वप्न ही राष्ट्राच्या हिताची असतात. तुम्हाला जो स्वप्नातला अजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली.”

नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले, या फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हरले होते. नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा युती निवडणूक लढवली होती. हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही. ते राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेले जे मुलं असतात त्यांना डॉक्टरकी करता येत नाही. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता”, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.