हिंगोली : एका शाळकरी ऑटो रिक्षाचालकाला सुमारे दहा हजार रुपयांचा मोठा दंड आकारल्याची तक्रार रिक्षाचालकाने आमदार बांगर यांच्याकडे केली अन् एका क्षणाचाही विलंब न लावता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे एका उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. अशा प्रकारे मोठा दंड आकारल्यास आपल्या कार्यालयाला कुलूप ठोकेन, अशा शब्दांमध्ये अधिकाऱ्यांवर आमदार संतोष बांगर यांनी संताप व्यक्त केला. आमदार बांगर हे अधिकाऱ्यांना खडसावतानाची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून, त्यावरून पुन्हा एका ते चर्चेत आले आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटो चालकाला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सुमारे दहा ते बारा हजारांचा मोठा दंड ठोठावल्याचा प्रकार घडला होता. रिक्षाचालकाने आमदार बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आमदार बांगर यांनी आक्रमक होत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच बोल सुनावले. त्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला बांगर म्हणाले, की शाळेत मुले ने-आण करणाऱ्या ऑटोवाल्यांना दहा-दहा हजारांचा दंड लावणे योग्य आहे का? उद्या त्यांनी मुलांना नेणे बंद केले, तर शाळा ओस पडतील. दंडाशी संबंधित तोडगा नाही काढला, तर आपण थेट उपप्रादेशिक कार्यालयात येऊन कुलूप ठोकू.
आमदार बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चर्चेत आलेले एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. शिंदे गटात सर्वांत शेवटी सामील झालेल्या आमदारांपैकी ते एक आहेत. विशेष म्हणजे, बंडखोरी सुरू असताना अनेक आमदार शिंदे गटात जात असताना, बांगर यांनी जाहीरपणे आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, असे ओक्साबोक्सी रडतच ग्वाही दिली होती. मात्र, काही दिवसांतच त्यांनी आपला शब्द फिरवला आणि ते शिंदे गटात सामील झाले होते.
बांगरांविषयी शिंदे काय म्हणाले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ ऑगस्टला कावड कार्यक्रमानिमित्त हिंगोलीत आले असता आपल्या भाषणातून बोलताना ते म्हणाले, की संतोषला मी चांगले वागण्याचा कानमंत्र दिला. गोड बोलण्याने जग जिंकता येते. तेव्हापासून त्याच्या वागण्यात मोठे परिवर्तन झाले. आता मीच इतरांना संतोषसारखे वागा असा सल्ला देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. त्याच्या चौथ्याच दिवशी आमदार बांगर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला खडे बोल सुनावल्याचा चित्रफीत बाहेर आली आणि पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरले.