गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. यात आता अजून एक नाव सामील झालं आहे. अभिनेता अमित साधने हा निर्णय घेतला आहे. त्याने आज सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. आपण ऑफलाईन जात आहोत असं म्हणत त्याने सोशल मीडियाला निरोप दिला.
या मागचं कारण त्यानं असं सांगितलं की, रिल्स किंवा जिममधले व्हिडिओ असतील, या अशा फालतू गोष्टी पोस्ट करून ना कोणाची मदत होते ना कोणाचं मनोरंजन होतं. तो पुढे म्हणतो, ‘कोणावरही टीका करत नाही. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि ती आपण प्रार्थना करुन आणि गोष्टी अजून चांगल्या कशा होतील यासाठी आशावादी राहून दाखवू शकतो.”
तो पुढे असंही म्हणाला, “मी सोशल मीडिया हँडल्स बंद करत नाही तर केवळ त्यावर काही पोस्ट अथवा शेअर करणार नाही. महाराष्ट्रात तसंच देशातही सध्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबद्दल बोलताना अमित म्हणाला, सध्याची जी परिस्थिती आहे तिने मला विचार करायला भाग पाडलं की मी माझे फोटो किंवा व्हिडिओ का पोस्ट करत आहे. आणि विशेषतः जेव्हा माझं शहर मुंबई,माझं राज्य कडक निर्बंधांखाली आहे. माझा देश कठीण काळातून जात आहे.”
महाराष्ट्रात सध्या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आणि विकेंडला कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
अमित पुढे म्हणाला, “मी जे करणं अपेक्षित आहे ते मी करतच राहीन म्हणजे मास्क वापरणे, योग्य अंतर पाळणे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडणे आणि शासनाच्या नियमांचं पालन करणे. त्याने त्याच्या चाहत्यांनाही गरीबांना मदत कऱण्याचं आवाहन केलं आहे. मजुरी करणाऱ्या लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत मला खूप वाईट वाटत आहे की आपल्याला अजूनही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. आपण सर्व काही ठीक असल्यासारखं नाही वागू शकत. ही महामारी आहे.”
अमितने आपल्या चाहत्यांना गरज पडल्यास आपल्याला मेसेज करु शकता, पण मी कोणत्याही गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही असंही सांगितलं आहे.
अमित सध्या ‘क्यू होता है प्यार’ या मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. तो ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्येही सहभागी झाला होता. राजकुमार राव आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यासोबत त्याने २०१३ सालच्या ‘काय पो चे’ या सिनेमातही काम केलं होतं.