Animal Fame Actor Talks About Ranbir Kapoor : रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यापूर्वी अभिनेता संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून झळकलेला. या चित्रपटात त्याच्याबरोबर इतरही लोकप्रिय कलाकार पाहायला मिळाले होते. अशातच आता यातील एका अभिनेत्याने रणबीर कपूरसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये बॉबी देओल, तृप्ती डिमरी, उपेंद्र लिमये हे कलाकार झळकलेले. या चित्रपटात बॉबी देओलच्या भावाच्या भूमिकेत अभिनेते सौरभ सचदेवा झळकले होते. त्यावेळी त्यांच्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. अशातच आता सौरभ यांनी भारती सिंह व हर्ष लिंबाचिया यांना दिलेल्या मुलाखतीत ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

रणबीर कपूरबद्दल सौरभ सचदेवा यांची प्रतिक्रिया

रणबीरबद्दल ते म्हणाले, “त्याच्याबरोबर काम करताना मज्जा आली. त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल खूप कुतूहल असतं. त्याला तुमच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं असतं. त्याने मला अनेक गोष्टींबद्दल विचारलं. मी त्याला मास्क वर्कबद्दल सांगितलं. त्याने मला सांगितलं की, त्यालाही करायचं आहे. मी त्याला म्हटलं तू नक्की करशील. गोष्टींबाबत कुतूहल असणं ही कलाकाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट असते.”

सौरभ सचदेवा यांनी याच मुलाखतीत राघव जुयालबद्दलही सांगितलं आहे. सौरभ यांची (The Actor’s Truth) नावाने अभिनय शाळा आहे. त्यांनी आजवर अनुष्का शर्मा, वरुण धवन, राणा डगुबट्टी, रिचा चड्ढा, तृप्ती डिमरी, दुलकर सलमान आणि जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. राघव जुयालनेही त्यांच्याच अभिनय शाळेतून ट्रेनिंग घेतले आहे. सौरभ यांनी या मुलाखतीत राघवबद्दलही सांगितलं आहे.

राघव जुयालबद्दल सौरभ सचदेवा म्हणाले, “राघव माझ्याकडे आला तेव्हा त्याची होस्टिंग आणि डान्सची पार्श्वभूमी होती. तो नेहमी विनोद करायचा, कधी इतरांबद्दल तर कधी स्वत:बद्दल. जेव्हा तो जोक करायचा, तेव्हाच लोकांना हसू यायचं. पण, आता त्याला लोकांना हसवण्यासाठी जोक करण्याची गरज नाही. एकदा मी त्याला याबद्दल सांगितलेलं. स्टेजवर सादरीकरण करताना कदाचित त्याच्या या गोष्टींनी लोकांचं मनोरंजन होईल, त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, पण चित्रपटात असं नसतं. अशावेळी सीन कसा उत्तम करता येइल, त्या सीनमध्ये राहणं या गोष्टी कराव्या लागतात.”

दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकला होता. रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, बॉबी देओल, अनिल कपूर, उपेंद्र लिमये यांसारख्या कलाकारांच्या भूमिकांचंही प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. यामधून रश्मिका व रणबीर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं.