Virat Kohli One8 Commune Restaurant Juhu: विराट कोहली हा केवळ भारतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय क्रिकेटपटूच नाही, तर एक यशस्वी उद्योजक देखील आहे. One8 Commune नावाची त्याची रेस्टॉरंट चेन आहे. One8 Commune चे देशभरात एकूण १० आउटलेट आहेत. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांचाही त्यात समावेश आहे. पण मुंबईतील पहिल्या आउटलेट्सचं फिल्म कनेक्शन आहे.

जुहू येथील One8 Commune आउटलेटचे उद्घाटन २०२२ मध्ये झाले होते. ते दिवंगत दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात रिनोव्हेट करण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये, कोहलीने कबूल केलं होतं की किशोर कुमारबद्दल त्याच्या मनात नेहमीच एक हळवा कोपरा होता. “जेव्हा कोणीही विचारायचं की अशी कोणती व्यक्ती आहे, जी जिवंत असताना मला भेटायला आवडलं असतं, तर मी नेहमीच किशोर दा म्हणायचो. कारण त्यांचं व्यक्तिमत्व जादुई होतं,” असं विराट कोहली म्हणाला होता.

“One8 Commune टीमने जुहू आउटलेटमध्ये किशोर कुमार यांच्या बंगल्याला घरगुती ठेवलं आहे. मला कधीही स्ट्रक्चर्ड ठिकाणी जायला आवडत नाही. मला अशी रेस्टॉरंट्स आवडतात जिथे तुम्ही कधीही जाऊ शकता. किचन सकाळी उघडतं आणि दिवसभर उघडं असतं. आमच्या इथे इंटिरियर रॉ आणि कॅज्युअल आहे. तुम्हाला इथे शर्ट घालून यावं वाटणार नाही. तुम्ही टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून येऊ शकता, चिल करू शकता आणि कॉफी घेऊ शकता,” असं विराट कोहलीने म्हटलं होतं.

विराट कोहलीच्या जुहूमधील रेस्टॉरंटचे इनसाइड फोटो

One8 Commune Menu

One8 Commune हे नाव ठेवण्याचं कारण म्हणजे विराट कोहलीचा जर्सी नंबर १८ आहे. या रेस्टॉरंटच्या मेनूवर नजर टाकुयात. मेनूमधील एक पान खास “Virat’s favourites” पदार्थांचं आहे. यात ट्रफल तेलात बनवलेले टोफू स्टेक आणि मशरूम डंपलिंग्ज यांचा समावेश आहे. जुहू आउटलेटच्या मेनूनुसार, स्टीम्ड राइसची किंमत ३१८ रुपये आहे. तर, सॉल्टेड फ्राईजची किंमत ३४८ रुपयांपर्यंत आहे. इथे तंदुरी रोटी ११८ रुपयांना मिळते. तर, ‘बेबी’ नानची ११८ रुपयांना मिळते. डेझर्टबद्दल बोलायचं झाल्यास, मस्करपोन चीजकेकची किंमत ७४८ रुपये, तर पाळीव प्राण्यांसाठी पेट फूड ५१८ रुपये ते ८१८ रुपयांदरम्यान मिळते.

One8 Commune चे इतर आउटलेट्स

विराट कोहलीचे पहिले One8 Commune रेस्टॉरंट नवी दिल्लीतील एरोसिटीमध्ये सुरू करण्यात आले होते. या रेस्टॉरंटचे दिल्ली-एनसीआरमधील पंजाबी बाग आणि गुडगाव येथे आणखी दोन आउटलेट आहेत. मुंबईत लोअर परळमध्ये आणखी एक आउटलेट आहे. एक आउटलेट बेंगळुरूमध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या अगदी शेजारी आहे. विराट कोहलीसाठी ही दोन्ही शहरं खूप खास आहेत. कारण त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बेंगळुरूमध्ये वाढली आणि तो मूळचा दिल्लीचा आहे. या शहरांव्यतिरिक्त कोलकाता, पुणे, इंदूर आणि जयपूर येथे One8 Commune चे आणखी चार आउटलेट आहेत.