मुंबई: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचा भाऊ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार सचिन कांबळे यांच्यावर आरोप केला आहे. या प्रकरणात राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव संबंधित तरुणीवर होता. हे दिघे मिळून तेथील यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी केला. गृहमंत्र्यांच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी वरिष्ठांचा दबाव तसेच खासदारांच्या दोन खासगी सचिवांकडून दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे यांच्यावर आरोप केले. फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता.

महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाकडे सदर डॉक्टरने तक्रार केली होती. मात्र तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी दानवे यांनी केली. अभिजीत निंबाळकर हे फलटणमधील यंत्रणा चालवताता राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार सचिन कांबळे पाटील यांची त्यांना साथ आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या निंबाळकरांचे काय काम असते, असा सवाल त्यांनी केला. सचिन कांबळे हे अजित पवार गटापेक्षा भाजपचेच आमदार असल्याचाही आरोप त्यांनी केला. आमदार सचिन कांबळे, माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. शवविच्छेदन अहवाल त्यांच्या सोयीने करायला भाग पाडतात, खोटे गुन्हे नोंदवायला लावतात, असा आरोप त्यांनी केला.

दोन पदे झेपत नसतील तर राजीनामा द्या- यशोमती ठाकूर

फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद व गृहमंत्री पद स्वत:कडे ठेवले आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. दोन दोन पदे झेपत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली. महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली असून कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. जर कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि पोलिसांवर जरब ठेवता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.