Asias First Woman Railway Driver Surekha Yadav : आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव या भारतीय रेल्वेमध्ये तब्बल ३६ वर्षे सेवा केल्यानंतर आज निवृत्त झाल्या आहेत. खरं तर त्यांच्यासाठी इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास आव्हानात्मक होता. मात्र, तरीही त्यांच्या दृढनिश्चयामुळे त्यांनी ही सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली.

सुरेखा यादव या १९८८ मध्ये भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे पायलट बनल्या. १९८९ मध्ये त्यांनी सहाय्यक पायलट म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे त्यांना पदोन्नती मिळाली. १९९६ पर्यंत त्या रेल्वेच्या मालगाड्या चालवत होत्या. त्यानंतर २००० पासून पुढे त्यांनी डेक्कन क्वीन, वंदे भारतसह अनेक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या देखील चालवल्या. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

सुरेखा यादव यांनी त्यांच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत मालगाड्यांपासून ते उपनगरीय लोकलपर्यंत आणि नियमित लांब पल्ल्याच्या गाड्यांपासून ते राजधानी आणि वंदे भारत सारख्या एक्सप्रेस गाड्या चालवल्या आहेत. सुरेखा यादव यांनी १३ मार्च २०२३ रोजी सोलापूर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवली आणि एक महत्वाचा टप्पा गाठला. त्यामुळे सुरेखा यादव या हाय-स्पीड ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला पायलट देखील ठरल्या.

सुरेखा यादव यांच्याकडे महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक देखील करण्यात येत आहे. सुरेखा यादव या मूळ साताऱ्याच्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक होण्यापासून ते भारतातील सर्वात वेगवान गाड्या चालवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास धैर्य, चिकाटी आणि प्रगतीचं प्रतीक म्हणून माणलं जातं. आता आज त्या रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. मात्र, त्यांचा हा संपूर्ण प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.