मुंबई : बाण हवा की खान…अशी पूर्वी एक घोषणा चालायची.. दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला उरलाय फक्त खान…. अशी टीका उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनीच केली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचा हा जुना व्हिडिओ आता भाजपने पुन्हा प्रसारित केला आहे.
पालिका निवडणूकीच्या तोंडावर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्यक्षात प्रचार सुरू नसला तरी समाज माध्यमांवरून आपल्या विरोधकांचा अप्रचार करण्याची संधी मात्र सर्वच राजकीय पक्षांनी साधली आहे. पालिका निवडणूकांसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या शक्यतांमुळे यंदा पालिकेच्या रणांगणातील राजकीय गणिते वेगळी असतील. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे राजकारणात सध्या त्यांच्याच नावाची चर्चा आहे.
भाजपने मात्र राज ठाकरे यांची एक जुनी ध्वनीचित्रफित प्रसारित करून ठाकरे बंधूंनाच एकप्रकारे समाज माध्यमांवरून शह दिला आहे. लाव रे तो व्हिडिओ …..ही राज ठाकरे यांची भाषणाची स्टाईल वापरत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीच आपल्या अकाउंटवरून ही ध्वनिचित्रफित प्रसारित केली आहे. अक्षरश: एक मिनिटाच्या या ध्वनिचित्रफितीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
विधानसभा निवडणूकीच्यावेळची ही ध्वनिचित्रफित आहे. विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी १२८ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. तसेच प्रचारसभांमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवरही टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावरही ठाकरे यांनी जहरी टीका करीत त्यांना गद्दारही म्हटले होते. दिंडोशी मतदारसंघातील एका सभेतील या ध्वनिचित्रफितीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेकडून बाण तर निघून गेला फक्त खान उरला अशी टीका केली होती.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. महापालिकेची सत्ता अशा लोकांच्या हातात गेली तर एखादा खान मुंबईचा महापौर होईल, जागो मुंबई जागो, अशा शब्दात साटम यांनी एका पॉडकास्टमधअये टिका केली होती. त्यावरून चांगलाच वाद पेटला होता.
ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार हारून खान हे विधानसभा निवडणूकीत वर्सोवा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख करीत साटम यांनी ही टीका केली होती. त्यावरून ठाकरे यांच्या पक्षाने साटम यांना ट्रोल केले होते. परंतु, आता साटम यांनी ठाकरे यांचीच ध्वनिचित्रफित प्रसारित करून दोन्ही ठाकरे बंधूंनाच आव्हान दिले आहे.