मुंबई : आरक्षणाची मागणी पूर्ण कऱण्यासाठी शांतता मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र आमची गैरसोय कशी होईल याची काळजी सरकार घेत आहे, असे मराठा आंदोलकांतर्फे सोमवारी उच्च न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि, नागरिकांना त्रास होईल यासाठी रस्ते अडवून ठेवणे, स्थानकांत ठिय्या मांडून तेथे आणि रस्त्यावर नाचणे, खो-खो, कबड्डी, क्रिकेटसारखे खेळणे ? हेच का तुमचे शांततापूर्ण आंदोलन आहे का ? आंदोलनस्थळ सोडून इतरत्र का भटकत आहात ? अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच, तुमच्या या अशा शांततापूर्ण आंदोलनामुळे संपूर्ण दक्षिण मुंबई ठप्प झाली आहे, असे खडेबोलही सुनावले.

न्यायालयीन आदेशाचे, आंदोलनासाठीच्या सर्व अटींचे उल्लंघन करण्यात आले आहे. तरीही या आंदोलनाला तुम्ही शांततापूर्ण आंदोलन म्हणता ? असा टोलाही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मराठा आंदोलकांना हाणला. आम्ही शांततेच्या मार्गाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहोत. तथापि, आंदोलकांना मूलभूत सुविधा आणि गरजांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांची गैरसोय केली जात आहे, असा दावा काही आंदोलकांच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यावर तुम्ही शांततेत आंदोलन करत आहात. आझाद मैदानापुरती आंदोलनाची परवानगी असताना छत्रपती शिवाजी महाराज स्थानक (सीएसटीएम), महापालिका कार्यालय परिसरातील रस्ते, पदपथ बस स्थानके तुम्ही काबीज केली आहेत. स्थानकांसह रस्त्यांवर क्रिकेट, खो-खो, कबड्डीचे सामने रंगत आहेत. आझाद मैदानात कुस्तीचा फड रंगला आहे. हुतात्मा चौक, उच्च न्यायालय, नरीमन पॉईंट, मंत्रालयापर्यंत आंदोलनकर्ते पोहोचले आहेत, रस्त्यावरच जेवण, अंघोळ, प्रातःविधी करत आहेत. डीजेच्या तालावर नाचत आहेत. रस्ते अडवले जात आहेत, हे तुमच्यामते शांततापूर्ण आंदोलन आहे का ? यात शांतता कुठे आहे ? अशी विचारणा न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना केली.

तुमच्या गैरसोयीचे सांगता पण गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हवामान खाते दररोज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत आहे. आझाद मैदानात चिखल आणि पाणी साचणार याची तुम्हाला कल्पना होती ना ? तरीही तुम्ही आलात. तसेच, नुसते आला नाहीत, तर आणखी लाखोंचा जनसागर येईल, अशा वल्गना करत फिरत आहात. आम्ही आदोलकांनी मुंबईकरांना कसे वेठीस धरले आहे, याची छायाचित्रे आणि चित्रफिती पाहिल्या आहेत. हे शांततेच आंदोलन आहे का ? अशी विचारणा करून आदोलकांचे वकील या नात्याने जरांगे यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच न्यायालयाचे आदेश त्यांना आणि आंदोलकांना समजावून सांगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

वानखेडे-ब्रेबॉन स्टेडियमची मागणी कशी करता ?

आंदोलनकर्त्यांसाठी कोणतीही सोय नसल्यामुळे त्यांच्यासाठी वानखेडे-ब्रेबॉन स्टेडियमध्ये ताप्तुरती सोय करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यावर एका चित्रफितीचा दाखला देऊन त्यात आंदोलनकर्ते सिग्नल यंत्रणेवर चढून नाचताना दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले. ऐतिहासिक पुतळ्यांच्या पायथ्याशी बसून आंदोलक पत्त्यांचा डाव मांडत आहे, जेवण करत आहेत. अशाच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या दोन स्टेडियममध्ये त्यांना परवानगी दिली तर खेळपट्टी आणि मैदानाचे नुकसान करतील, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, आंदोलनकर्त्यांची मागणी फेटाळली.