मुंबई : दिवाळी एक महिन्यावर येऊन ठेपली असून, अनेकांनी दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. त्याचबरोबर नाताळनिमित्त सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला एखाद्या ठिकाणी जल्लोष करण्याचे बेत आखले जात आहेत. या सलग सुट्ट्यांच्या निमित्ताने विदेशी सहलींची घोषणा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) केली आहे.

परवडणाऱ्या शुल्कात या सहलींचे आयोजन करण्यात आल्याने कमी खर्चात नवीन देश बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ‘नवरत्न’ सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) आंतरराष्ट्रीय सहल योजनेची घोषणा केली आहे. जपान, भूतान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया या देशांत सहलीची योजना आखण्यात आली आहे. पर्यटकांना या देशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा ‘याचि देही याचि डोळा’ पाहता येणार आहे. तसेच, ही सहल पर्यटकांना परवडणाऱ्या शुल्कात आणि नवीन अनुभव देणारी असेल, अशी माहिती आयआरसीटीसीतर्फे देण्यात आली.

आरामदायी प्रवास, परवडणारे शुल्क आणि उत्तम दर्जा या सर्वाचा समतोल राखून विदेशी सहलीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी दिवाळी आणि नाताळमध्ये पर्यटकांना जगभ्रमंती करून, सुट्ट्यांचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आयआरसीटीसीने कमीत कमी खर्चात पर्यटकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जपान, भूतान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया या देशात फिरण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल, असे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरसीटीसी) पश्चिम विभागाचे मुंबईचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

आयआरसीटीसीचे मार्गदर्शक, परतीचा विमान प्रवास, आरामदायी उत्तम निवास स्थान, नाश्ता, भारतीय जेवण, स्थानिक पर्यटन, सर्व प्रवेश शुल्क, प्रवासी विमा, जीएसएटीसह सर्व शुल्क एकाच वेळी पर्यटकांकडून घेतले जाईल. या दौऱ्याची अधिक माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, आरक्षण करण्याची सुविधा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या कालावधीमधील दौरे

  • जपान – ५ ते १४ ऑक्टोबर २०२५
  • भूतान – ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५
  • थायलंड (फुकेट व क्राबी) – ३ ते ९ नोव्हेंबर २०२५
  • ऑस्ट्रेलिया – ११ ते २२ नोव्हेंबर २०२५
  • श्रीलंका (श्रीरामायण यात्रा) – २४ ते ३० नोव्हेंबर २०२५
  • व्हिएतनाम – १० ते १७ नोव्हेंबर २०२५
  • नेपाळ – २३ ते २८ डिसेंबर २०२५

पर्यटक आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून या सहलीचे आरक्षण करू शकतात. तसेच देशभरातील अधिकृत प्रवासी दलालामार्फत आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.