मुंबई : देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनची पायाभरणी १४ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे या प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला. जपानच्या धर्तीवर शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम केले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास डिसेंबर २०२९ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी चार वर्षे बुलेट ट्रेनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई – अहमदाबाददरम्यान ताशी ३२० किमी वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे १,०८,००० कोटी रुपये आहे. यापैकी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जीआयसीए) प्रकल्प खर्चाच्या एकूण ८१ टक्के म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये निधी देत आहे. उर्वरित १९ टक्के खर्च म्हणजेच २० हजार कोटी रुपये रेल्वे मंत्रालय (५० टक्के) आणि महाराष्ट्र (२५ टक्के) आणि गुजरात (२५ टक्के) राज्य सरकारांच्या इक्विटी योगदानाद्वारे करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय १० हजार कोटी, गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये निधी देणार आहे. ३० जुलै २०२५ पर्यंत या प्रकल्पावर ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती लोकसभेत रेल्वे, माहिती, प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्याची कारणे…

महाराष्ट्रातील भूसंपादनास झालेल्या विलंबामुळे २०२१ पर्यंत प्रकल्पावर परिणाम झाला आहे. तर, सध्या या प्रकल्पासाठी संपूर्ण भूसंपादन (१३८९.५ हेक्टर) झाले आहे. अंतिम स्थान सर्वेक्षण आणि भू-तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच संरेखन अंतिम झाले आहे. वन्यजीव, किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) आणि वन विभागाशी संबंधित सर्व वैधानिक मंजुरी मिळाली आहे प्रकल्पाचे कंत्राटे देण्यात आली असून एकूण २८ निविदा पॅकेजेसपैकी २४ निविदा पॅकेजेस देण्यात आली आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पातील कोणती कामे पूर्ण

आतापर्यंत, ३९२ किमी घाट बांधकाम, ३२९ किमी गर्डर कास्टिंग आणि ३०८ किमी तुळया उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. यासह वांद्रे-कुर्ला संकुल – ठाणेदरम्यान आणि ठाणे खाडीखालील बोगद्याचे काम सुरू आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प कधी पूर्ण होणार

गुजरातमधील वापी – साबरमतीदरम्यान डिसेंबर २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर, मुंबई – साबरमती विभाग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प अतिशय गुंतागुंतीचा असून या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वे रूळ, विद्युतीकरणाची कामे, सिग्नल यंत्रणा, दूरसंचार व इतर पायाभूत कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पूर्णत्वाची अचूक वेळ निश्चित करता येणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पात किती स्थानके

जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आकार घेत आहे. हा प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जात आहे. या प्रकल्पात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे १२ स्थानके प्रस्तावित आहेत.