मुंबई : लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांना रोखण्यासाठी तसेच त्यांना बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल तयार केली जात आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये लोकलच्या महिला डब्याला स्वयंचलित दरवाजे लावण्यात आले असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नुकतीच या डब्याची पाहणी केली.

गेल्या जून महिन्यात मुंब्रा येथे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीसह (आयसीएफ) बैठक घेतली. त्यानंतर, सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून, हवा खेळती राहील, अशा पद्धतीची रचना करून डबा तयार केला जाईल, असे ठरवण्यात आले.

त्यानंतर रेल्वे मंडळाने स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा असलेला नमुना डबा तयार करण्यात आला होता. महिला डब्याला नुकतेच स्वयंचलित दरवाजे जोडण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह अन्य वरिष्ठांनी नमुना डब्याची पाहणी केली.

नवीन नमुना डबा असा असेल

लोकलच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजाला सर्वात खालच्या भागात मोठ्या आकाराची जाळी बसविण्यात आली आहे. त्यामुळे या जाळीतून हवा येणे सोपे होईल. मधल्या भागात हवेशीर पट्ट्या लावण्यात आल्याने हवा अधिकाधिक खेळती राहील, सर्वात वरच्या भागात मोठ्या आकाराची बंदिस्त पारदर्शक खिडकी बसवण्यात आली आहे. दरवाजा बंद झाल्यानंतरही प्रवाशांचा श्वास गुदमरणार नाही, अशा पद्धतीची रचना डब्यात केली आहे.

स्वयंचलित दरवाजा असलेली पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत तयार होईल. तर, आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल.

लोकलला स्वयंचलित दरवाजे लावल्यानंतर, लोकलचे डबे हे एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यात प्रवेश करणे शक्य होईल.