मुंबई : केंद्र सरकारने पिवळा वाटाणा, तूर आणि उडदाच्या शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिली आहे. हरभरा, मसूरच्या आयातीवर केवळ दहा टक्के आयात शुल्क लागू केला आहे. अत्यंत स्वस्तातील आयातीमुळे देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हमीभावा इतकाही दर मिळत नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

केंद्र सरकारने ग्राहक हितासाठी पिवळा वाटाणा, तूर आणि उडदाच्या शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिली आहे. हरभरा, मसूरच्या आयातीवर केवळ दहा टक्के आयात शुल्क लागू आहेत. आयात शुल्कात सवलत दिल्यामुळे अत्यंत स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणावर कडधान्य, डाळींची आयात होत आहे. त्यामुळे बाजारात कडधान्यांचे दर आवाक्यात आहेत. पण, देशातील कडधान्य उत्पादकांना हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे.

शुल्क हटल्यामुळे पिवळा वाटाणा फक्त ३०० डॉलर प्रति टन दराने आयात होत आहे. हरभरा ५०० ते ५२० रुपये प्रति टन, तूर ५०० ते ५२५ डॉलर प्रति टन, मसूर ४९० डॉलर प्रति टन दराने आयात होत आहे. हमीभावाच्या तुलनेत ४० टक्के कमी दराने तूर, हरभरा २० टक्के आणि मसूर २० टक्के कमी दराने आयात होत आहे. हरभरा ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया, पिवळा वाटाणा कॅनडा आणि रशिया, मसूर कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आणि तुरीची आयात पूर्व आफ्रिकी देश आणि म्यानमारमधून होत आहे. स्वतात आयात होत असल्यामुळे कडधान्यांचे दर गडगडले आहेत.

ग्राहकांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी

केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५६५० रुपये असताना बाजारात सरासरी ५००० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. मसूरचा हमीभाव ६७०० रुपये असून, बाजारात ६००० ते ६५०० रुपये क्विंटलने विक्री सुरू आहे. तुरीचा हमीभाव ८००० असताना ६००० ते ६२०० रुपये दराने विक्री सुरू आहे आणि उडदाचा हमीभाव ७८०० रुपये असून, ७५०० ते ८५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत, ग्राहकांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे, असे मत शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.

ग्राहकांनाही फारसा दिलासा नाही ?

गतवर्षी याच काळात तुरीचा भाव १८० रुपये किलोवर गेला होता. यंदा तो १०० ते १२० रुपयांवर आहे. आयात धोरणामुळे डाळींचे दर गतवर्षीच्या तुलनेत सरासरी २० रुपयांनी कमी आहेत. पण, ज्या स्वस्त दराने आयात होते, तितकी स्वस्ताई किरकोळ बाजारात दिसून येत नाही. सध्या किरकोळ बाजारात हरभरा – ८० – ९० रुपये प्रति किलो, हरभरा डाळ – १०० – १२० रुपये, पिवळा वाटाणा – ६० ते ७० रुपये, अख्खा मसूर ८५ – १०० रुपये, मसूर डाळ ९० ते ११० रुपये. तूरडाळ – ११० ते १३० रुपये आणि उडीद ११० ते १३० रुपये प्रति किलो आहे. गतवर्षी तूर याच १८० किलो रुपये केली होती. गतवर्षी प्रति किलो १० ते २० कमी आहेत, अशी माहिती कडधान्यांचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

सरकारचे धोरण चुकीचे

केंद्र सरकारने पिवळा वाटाणा, तूर आणि उडदावरील आयात शुल्क उठविला आहे. मसूर, हरभऱ्याच्या आयातीवर फक्त दहा टक्के कर आहे. अत्यंत कमी आयात दराने कडधान्यांच्या आयात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. हमीभावापेक्षा २० ते ४० टक्के कमी दरात कडधान्ये, डाळींची आयात होत आहे. संघटनेच्या वतीने अनेकदा आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे, अशी टीका इंडियन पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी यांनी केली आहे.