मुंबई : अंधेरी – घाटकोपर जोड मार्ग रुंदीकरणाआड येणारी ३७ व्यावसायिक बांधकामे हटवण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) याच भागात पुलाचे बांधकाम करणार असून ही बांधकामे हटवल्यामुळे या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंधेरी – घाटकोपर जोड मार्ग पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा महत्त्वचा जोडरस्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गाची क्षमता कमी पडू लागली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेने या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच याच मार्गावर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) उड्डाणपूल बांधणार आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांसाठी काही बांधकामांचा अडथळा येत होता. त्यापैकी अनधिकृत बांधकामे आधीच मुंबई महापालिकेच्या एन विभागाने मार्च २०२४ मध्ये हटवली होती.
आता या दोन प्रकल्पांच्या आड येत असलेली व्यावसायिक बांधकामे हटवण्यात आली. अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाचे (एजीएलआर) रुंदीकरण आणि महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) बांधत असलेल्या पुलाच्या कामामुळे बाधित होत असलेल्या ३७ व्यावसायिक बांधकामांचे शुक्रवारी महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाने निष्कासन केले. सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाचे घाटकोपर परिसरात रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. तसेच, याच परिसरात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमआरआयडीसी) पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये अडथळा ठरत असलेल्या ३७ व्यावसायिक बांधकामांना रितसर सूचना देऊन, तसेच नुकसानभरपाई देऊन निष्कासनाची कारवाई करण्यात आली.