मुंबई : कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल मुंबईस्थित कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आता प्रवाशांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी खासदारांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला असून दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांबाबत खासदारांना ई-मेल पाठविण्यास सुरुवात केली आहे. खासदारांना पाठविण्यात येत असलेल्या ई-मेलमध्ये मागण्यांच्या निवेदनासोबतच आवश्यक दस्तऐवज जोडण्यात आले आहेत. खासदारांनी या मागण्यांना संसदेत वाचा फोडावी, अशी अपेक्षा कोकणवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणवासीयांची प्रमुख मागणी
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावे, ही प्रमुख मागणी खासदारांकडे करण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील रत्नागिरी प्रदेश (रोहा-मादुरे) मध्य रेल्वेत आणि कारवार प्रदेश (पेर्णेम-ठोकूर) दक्षिण – पश्चिम रेल्वेमध्ये विलीन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अमृत भारत स्थानक योजनेत ‘या’ स्थानकांचा समावेश करावा
अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेवरील मडगाव आणि उडुपी स्थानके नियोजित आहेत. मडगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३४८.५० कोटी रुपये आणि उडुपी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ८७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु, कोकण रेल्वेवरील महाराष्ट्रातील स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोकण महाराष्ट्रातील रेल्वेवरील पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांचा समावेश करावा.
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करा
गेल्या २० वर्षांत कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत संख्या प्रचंड वाढ झाली आहे. परंतु, त्या तुलनेने रेल्वेगाड्यांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने कोकण रेल्वेचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. रोहा – ठोकुर दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेचे अंतर ७३९ किमी आहे. यापैकी रोहा – वीरदरम्यानच्या ४६.८ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ मध्ये दुहेरीकरण पूर्ण झाले. त्यानंतर दुहेरीकरणाला गती मिळालेली नाही. परिणामी, प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मुंबई – मडगाव – मंगळुरू मार्ग उच्च – घनतेच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करून संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण सुरू करावे आणि वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दादर-रत्नागिरी रेल्वे सेवा सुरू करावी
गाडी क्रमांक ५०१०३ / ५०१०४ रत्नागिरी-दिवा रेल्वे दादरवरून पुनर्संचयित करावी. तसेच या रेल्वेगाडीला २२ एलएचबी डबे जोडावे. गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेस २२ एलएचबी डबे आणि ८ अनारक्षित डब्यासह सीएसएमटी / दादर / एलटीटी / ठाण्यापर्यंत विस्तार करावा. त्याचबरोबर कोकणातील स्थानकांवरथांबा असलेली एक नवीन दिवसा धावणारी सीएसएमटी – चिपळूण रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
रेल्वे विस्तार करावा
कोकणातील प्रवाशांना लाभ व्हावा यादृष्टीने गाडी क्रमांक १७६१३ / १७६१४ नांदेड – पनवेल एक्स्प्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा. त्याचबरोबर या रेल्वेगाडीला कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा द्यावा.
कोकण रेल्वेवरील अधिभार काढावा
कोकण रेल्वेवरील प्रवासी भाड्यातील ४० टक्के, तर माल अधिभारातील ५० टक्के अधिभार काढून टाकावा. तसेच, सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची निर्मिती करून सावंतवाडी रोड स्थानकावरील प्रलंबित कामे पूर्ण करावी.