मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मतदार यादीत दुबार मतदार असल्याचे मान्य केले आहे. आता त्यांनी तातडीने दुबार मतदारांची नावे, संख्या जाहीर करावी. निवडणूक यादीत चुका आहेत. त्यामुळे मतदार यादीतील चुका दुरुस्त करून निवडणूक जाहीर करण्याची गरज होती. पण, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी नेत्यांचा दबाबामुळे आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केला.

मतदार यादीत एकच नाव दोन, तीन, चार वेळा आहे. असे लाखो दुबार मतदार आहेत. दुबार मतरादार असल्याचे सर्वच राजकीय पक्षांसह आता राज्य निवडणूक आयोगानेही मान्य केले आहे. मतदार याद्या दुरुस्त करून निवडणुका जाहीर करण्याची गरज होती. पण, तसे झाले नाही. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या दबावामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत सहा महिन्यांत ४८ लाख मतदार वाढले आहेत. महिन्याला आठ लाख मतदार वाढले आहेत. या ठिकाणीच सत्ताधाऱ्यांनी घोळ केला आहे.

अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात फहाद अहमद हा लोकांच्या मनातला आमदार आहे, पण मतदार यादीतील त्रुटींमुळेच त्याचा पराभव झाला. मतदारसंघात झालेली मतदार वाढ ३,८६५ आणि दुबार मतदारांची संख्या १,३०८ मिळून ५,१७३ होते, तर फहाद अहमद यांचा पराभव फक्त ३,३७८ मतांनी पराभूत झाले आहेत.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तब्बल १४ हजार दुबार मतदारांचे पुरावे आम्ही दिले आहेत. त्यात सर्वच जाती- धर्माचे मतदार आहेत. शिरुर मतदारसंघात १,१३३ दुबार मतदार आणि १,५७८ मिसिंग नोटीस आहेत. चिंचवड मतदारसंघात तब्बल ५४,६६० लोकांची घुसखोरी झाल्याचा दावाही पवार यांनी केला.

… तर आयोग भाजपची बी टीम

आम्ही मागणी करूनही डिजिटल मतदार यादी दिली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे छायाचित्रण दिले नाही. आयोगाला ईव्हीएम मशीन पाहिजे. पण, व्हीव्हीपॅट नको आहे. आमचे सर्व आरोप खरे ठरले आहेत. दुबार मतदार असूनही निवडणुका घेणे लोकशाही विरोधी आहे. निवडणूक आयोगाने पुढील दोन दिवसांत दुबार मतदारांची नावे, संख्या जाहीर न केल्यास आयोग भाजपची बी टीम आहे, असे म्हणावे लागेल, असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.